
पुणे : शरद पवार हे अत्यंत अनुभवी नेते आहेत. त्यामुळे मला ज्यावेळी सल्ल्याची गरज असते, त्यावेळी मी शरद पवारांना फोन करतो. ते नेहमी चांगले सल्ले देतात, या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवारांचे कौतूक (CM Eknath Shinde on Sharad Pawar) केले. पुण्यातील मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी पवारांच्या उपस्थितीतच त्यांचे कौतूक केले. यावेळी अजित पवार, जयंत पाटीलही उपस्थित होते. शरद पवार यांच्या तोंडी नेहमी साखर असते. राज्याच्या हितासाठी, भल्यासाठी ते नेहमीच मार्गदर्शन करतात. मलाही जेव्हा गरज आहे तेव्हा फोन करतात व सूचना करतात. सहकार क्षेत्रातील त्यांचे योगदान हे नाकारता येणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले, मी नुकतेच दाओसला जाऊन आलो. कोणी काहीही म्हणो पण मी चांगली गुंतवणूक आणलेली आहे. शरद पवार यांना यासंदर्भात माहिती आहे. सहकार क्षेत्रात पवार यांचा शब्द अंतिम मानला जातो. पवार सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठिशी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचे सल्ले ऐकून शेतीत किंवा उद्योगात बदल केले पाहिजे. त्यांनी नेहमी मार्गदर्शन करावे व याचा राज्याला नक्कीच फायदा होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमीच इथेनॉल वापराला प्राधान्य देत आले आहेत. याचा साखर कारखानदारांना फायदा होईल. वस्त्रोद्योगानंतर साखर उद्योगांचा नंबर लागतो. आर्थिक चक्र सक्रिय ठेवण्यात साखर उद्योगांचा मोठा हातभार लागतो. साखर उत्पादनात जगात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे ही अभिमानाची बाब आहे. साखर उद्योग वाढला पाहिजे, टिकला पाहिजे यासाठी सरकार अतिशय गांभीर्याने काम करत आहे, असे ते म्हणाले.