मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्हावरील एकनाथ शिंदे गटाचा दावा मान्य करीत उद्धव ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे. पक्षाचे नाव शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाला निवडणूक चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे. यासंदर्भात स्वतः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray to Challenge EC Decision on Party & Symbol) यांनीच काल घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी निर्णय देऊ नये, अशी विनंती ठाकरे गटाकडून आयोगाला करण्यात आली होती. मात्र निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला आहे. आपला युक्तिवाद निवडणूक आयोगाने विचारात घेतला नसल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे.
निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असून त्यांच्या निर्णयात हस्तक्षेप करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले तर न्यायालय हस्तक्षेप करणार का? असाही प्रश्न यासंदर्भात निर्माण करण्यात येत आहे. काही तज्ज्ञांच्या मते निर्णय देताना आयोगाने चूक केली असल्यास सर्वोच्च न्यायालयास स्थगनादेश देण्याचा नक्कीच अधिकार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाला दिलासा मिळणार काय, याकडे आता लक्ष लागले आहे.
काल निवडणूक आयोगाने शिंदे गटाचा शिवसेना व धनुष्यबाणावरी दावा मान्य केला होता. त्याचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटले आहेत. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे या नव्या घडामोडींचे मोठे राजकीय परिमाण होण्याची चिन्हे दिसत आहेत.