
– एआयडीने केले केंद्राच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत
– पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार
नागपूर(Nagpur), 13 मे:
भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) मालकीची आणि मिहान इंडिया लिमिटेड (एमआयएल) ला भाडेपट्ट्यावर देण्यात आलेल्या जमिनीच्या लीज कालावधीला वाढवण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या ऐतिहासिक निर्णयाचे असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयन डेव्हलपमेंट (एआयडी) ने स्वागत केले आहे.
या निर्णयामुळे आता सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरण आणि उन्नतीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आधुनिकीकरण होऊन मध्य भारतातील जागतिक दर्जाचे विमान वाहतूक केंद्र म्हणून विकसित होईल असा विश्वास एआयडीने व्यक्त केला आहे.
एआयडीने या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजारपु राममोहन नायडू, राज्यमंत्री मुरलीधर मोहोल तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित विभागांकडे अनेक निवेदने व पाठपुरावा केला होता. फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निवेदन सादर करून विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठी तातडीने मंजुरी देण्याची विनंती करण्यात आली होती.
एआयडीचे अध्यक्ष आशीष काळे म्हणाले, हा निर्णय विदर्भाच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासासाठी टर्निंग पॉइंट ठरणार असून, नागपूरचे प्रवासी वाहतूक, कार्गो, लॉजिस्टिक्स, निर्यात, गुंतवणूक, पर्यटन आणि रोजगारनिर्मितीचे प्रमुख केंद्र म्हणून स्थान अधिक बळकट होईल.
या परिवर्तनकारी प्रस्तावाला मंजुरी दिल्याबद्दल आशीष काळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले आहेत.
विमानतळाच्या टप्प्याटप्प्याने होणाऱ्या विकासामुळे भविष्यात दरवर्षी लाखो प्रवाशांचे आवागमन आणि कार्गो क्षमता देखील वाढेल. त्यामुळे व्यापार, उद्योग, उत्पादन, निर्यात, पर्यटन आणि रोजगार क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होतील, असा विश्वास एआयडीने व्यक्त केला.
















