Home Top News केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा एआयडीतर्फे सत्कार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा एआयडीतर्फे सत्कार

0

नागपूर विमानतळ आधुनिकीकरणातील महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल केला गौरव

नागपूर, दि. १६ मे :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरण प्रस्तावाला गती देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एआयडी) तर्फे केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांचा शनिवारी सत्कार करण्यात आला.

एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (एएआय) च्या मालकीची व मिहान इंडिया लिमिटेड (एमआयएल) ला भाडेपट्ट्याने देण्यात आलेल्या जमिनीच्या लीज कालावधीवाढीस केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलअंतर्गत विमानतळाच्या आधुनिकीकरण आणि विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानिमित्त हा सत्कार करण्यात आला.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास मंजुरी मिळावी यासाठी संस्थेने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि संबंधित विभागांकडे एआयडीने सातत्याने पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने नागपूरला मध्य भारतातील प्रमुख विमान वाहतूक, लॉजिस्टिक्स आणि औद्योगिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी विमानतळाचे आधुनिकीकरण अत्यंत महत्त्वाचे असल्याची भूमिका गडकरी यांनी केंद्र सरकारसमोर ठामपणे मांडली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाने यासंदर्भात अलीकडेच घेतलेला निर्णय हा या सातत्यपूर्ण प्रयत्नांची फलश्रुती मानला जात आहे.

यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी, विमानतळाच्या आधुनिकीकरणामुळे प्रवासी वाहतूक, कार्गो सेवा, गुंतवणूक, पर्यटन तसेच रोजगाराच्या संधींमध्ये मोठी वाढ होईल, असा
विश्वास व्यक्त केला.

याप्रसंगी एआयडीचे अध्यक्ष आशिष काळे, सचिव डॉ. विजय कुमार शर्मा, कार्यकारिणी सदस्य प्रशांत उगेमुगे, डॉ. महेंद्र क्षीरसागर, अशोक गोयल, अविनाश घुशे, निर्भय संचेती तसेच विविध क्षेत्रांचे संयोजक व सहसंयोजक रवलीन सिंह खुराना, तेजिंदर सिंह रेणू, आकाश सिंह, आदित्य भाटिया, शैलेश आवळे, संजय गुप्ता, डॉ. किशोर मालवीय, राहुल करंगळे, अमित काळे, उज्ज्वल बांबल, शशिकांत चौधरी, प्रभाकर मांढरे, अमोल खंते, विनय चावला, विशाल बांगरे, चेतन मरवाह, महेश साधवानी, विशाल माथूर आणि पंकज भोकरे उपस्थित होते.

 

#NitinGadkari #NagpurAirport #NagpurDevelopment #AirportModernization #DrBabasahebAmbedkarAirport #NagpurNews #MIHAN #AAI #PPPModel #InfrastructureDevelopment #CentralIndia #LogisticsHub #IndustrialDevelopment #AIDNagpur #MaharashtraNews #CargoServices #TourismGrowth #EmploymentOpportunities #NagpurUpdates #IndiaInfrastructure

—————————————