“गद्दारांना..चोरांना निवडणुकीत गाडू, निवडणूक आयुक्त गुलाम…”

0

उद्धव ठाकरेंची टीका, मुंबईत शक्तीप्रदर्शन, कलानगरात खुल्या जीपमधून शिवसैनिकांशी संवाद
मुंबईः निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शनिवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांनी मातोश्रीबाहेर जमून शक्तिप्रदर्शन केले. दादर येथील शिवसेना भवनाजवळही शिवसैनिकांनी शक्तिप्रदर्शन करत आयोगाच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी केली (Uddhav Thackeray ). विशेष म्हणजे, आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी खासदार, आमदार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक भविष्यातील रणनीती ठरवण्यासाठी बोलावली आहे. शनिवारी दुपारी कलानगर येथे खुल्या जीपमधून शिवसैनिकांशी संवाद साधत निवडणूक आयोग, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व बंडखोर आमदारांवर टीका केली. विशेष म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळी आपले पहिले भाषण गाडीच्या टपावरून केले होते. त्यामुळे शिवसैनिकांना भावनिक आवाहन करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी तेच डावपेच वापरले. “गद्दारांना निवडणुकीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नसून आम्ही चोरांना धडा शिकवणार आहोत. सरकारी यंत्रणा भाजपच्या गुलाम झाल्या असून निवडणूक आयुक्त देखील पंतप्रधानांचे गुलाम झाले आहेत…” अशी पातळी सोडणारी टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, “एक दिवस असा होता मोदींचे मुखवटे घालून प्रचार केला जायचा. मात्र, आज मोदींना बाळासाहेब ठाकरेंचा मुखवटा घालून यावे लागत आहे. आज महाराष्ट्रात मोदी चालत नाही. रावणानेही शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काय झालं? रावण उताणा पडला. आता ज्या चोरांनी शिवधनुष्य चोरलेय. तेदेखील उताणे पडल्याशिवाय राहणार नाही. लढाई आता सुरू झालीये. ही चोरी आपण त्यांना पचू द्यायची नाही. तुम्ही शिवधनुष्य घेऊन या, मी मशाल घेऊन येईल”, असे आव्हानही त्यांनी दिले. तत्पूर्वी मातोश्रीसमोर उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांशी संवाद साधला. आजही लाखो शिवसैनिक माझ्या पाठिशी आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरीला गेल्याने सावध राहण्याचे आवाहन केले. महाराष्ट्राला दिल्लीपुढे झुकवणारे बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक असू शकत नाहीत, अशी तिखट टीकाही उद्धव यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली आहे. शिवसेनेचे नाव चोरले जाऊ शकते, पण ‘शिवसेना’ चोरता येणार नाही, असे पण ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ बोरिवली, दहिसर, कांदिवली, मालाड, जोगेश्वरी, अंधेरीसह संपूर्ण मुंबईत शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. मुख्यमंत्री शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतरही ते उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.