२०४७ पर्यंत भारत जगाचे नेतृत्व करेल-अमित शहा

0

नागपूरः “भाजपने कधीही मतपेढीचं राजकारण केलं नाही. पूर्वी फुटीर हुरियत नेत्यांच्या तालावर दिल्ली नाचायची, आम्ही हुरियतचे कार्यालयच सील करून टाकले. काश्मिरात रक्ताच्या नद्या वाहतील, अशी भीती विरोधक दाखवायचे. तिथे आता कोणाची दगड मारण्याची हिंमत नाही. काश्मिरात आजवरच्या 70 वर्षांत 12 हजार कोटींची गुंतवणूक झाली होती. आता तीन वर्षांतच 12 हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. काश्मीरसह ईशान्य भागातील डाव्यांचाही दहशतवाद आम्ही मोडून काढला. इशान्येत विद्रोह करणारे आठ हजारांवर युवक मुख्य प्रवाहात आले आहेत” या शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागपुरात मोदी सरकारच्या उपलब्धी सांगताना (Home Minister Amit Shah in Nagpur) विरोधकांचा समाचार घेतला. नागपुरात एका वृत्तपत्रसमूहाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थित होती. अमित शहा म्हणाले, “जागतिक अर्थव्यवस्थेत ब्रिटिश अर्थव्यवस्था पाचव्या क्रमाकांवर होती. मात्र, आज भारतीय अर्थव्यवस्थेने त्यांना मागे टाकत पाचवे स्थान मिळवले आहे.

हायड्रोजन उत्पादनात आपण दोन ते तीन वर्षांत नेतृत्व करू. अंतराळ धोरणामुळे आज चंद्रावर गेलो, भारतीय स्टार्टअपचा जगात दबदबा आहे. अशीच आणखी काही संकल्पपूर्ती करायची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पाप्रमाणे २०४७ पर्यंत भारत जगाचे नेतृत्व करताना दिसणार आहेत. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने एक पाऊल पुढे टाकले तरी आम्ही मोठी मजल गाठू शकतो. सध्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे. देशाची पायाभरणी करण्याचे काम झाले आहे. आता जगात देशाला प्रथम क्रमाकांचा देश म्हणून पुढे आणण्याची संकल्पपूर्ती युवा पिढीने करावी”, असे आवाहन शहा यांनी केले.
‘अमृतकाळात प्रत्येकाला वैयक्तिक हित बाजूला ठेवून सर्वप्रथम देश हा संकल्प करायचा आहे. संपूर्ण जगात भारताला विश्वगुरू म्हणून स्थान मिळवून देताना जगात क्रमांक एकचा देश करायचा आहे”, असेही शहा म्हणाले.