Home LOCAL NEWS जयताळा बस स्टॉप ते पायोनियर डॅफोडिल रस्त्याचे रुंदीकरण करा!

जयताळा बस स्टॉप ते पायोनियर डॅफोडिल रस्त्याचे रुंदीकरण करा!

0

भाजयुमो उपाध्यक्ष पारेंद्र पटले यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

नागपूर(Nagpur) : जयताळा बस स्टॉप ते पायोनियर डॅफोडिल दरम्यानच्या रस्त्याचे तात्काळ रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी भाजयुमो चे प्रदेश उपाध्यक्ष पारेंद्र पटले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

यासंदर्भात पटले यांनी नुकतेच एक निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. निवेदनात नमूद केल्यानुसार, या रस्त्याचा दर्जा अत्यंत खराब असून वाहतूककोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी सातत्याने वाढत आहेत.सदर भागातील रस्ता अरुंद असल्यामुळे सेवाभावी संस्था, शाळांची वाहने, रुग्णवाहिका तसेच स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून अपुऱ्या सुविधांमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

घरांचे नुकसान टाळण्यासाठी न्याय्य पुनर्वसनाची मागणी

रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये बाधित होणाऱ्या घरांची संख्या लक्षात घेऊन, सर्व प्रभावित नागरिकांना शासनाच्या नियमांनुसार न्याय्य पुनर्वसन आणि योग्य नुकसानीची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी पटले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.रस्त्याचे रुंदीकरण हा स्थानिक नागरिकांच्या हिताचा मुद्दा असून रस्ता रुंद झाल्यास वाहतुकीची समस्या सुटून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे पटले यांनी निवेदनात म्हटले आहे.परिसरातील वाढत्या वाहतूक दडपणाचा विचार करून तात्काळ निर्णय घेण्यात यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.