नागपूर : काटोल अथवा सावनेरमधून भाजपचा उमेदवार कोण असणार ? या प्रश्नाचे उत्तर आगामी काही दिवसांत मिळण्याची शक्यता दिसत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी शनिवारी साकळी निलंबित काँग्रेस नेते आशिष देशमुख (Suspended Congress Leader Ashish Deshmukh) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. देवेंद्र फडणवीस आज नागपूर जिल्ह्यातील हिंगणा आणि उमरेड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. मात्र त्यापूर्वी ते देशमुखांच्या घरी पोहोचले आहेत. फडणवीस यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचाही समावेश होता. काँग्रेसमधून निलंबित झालेले आशीष देशमुख हे पुन्हा भाजपच्या वाटेवर आहे का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित झाला असून त्याचे उत्तर लवकरच मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
देवेंद्र फडणवीस काल दिल्लीला जाऊन आल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात त्यांनी अचानक दिल्ली दौरा केला असल्याचे सांगण्यात येत आहे. तेथून आल्यावर आज सकाळी त्यांनी आशिष देशमुखांचे घर गाठले. फडणवीसांनी काल सावनेरमध्ये एक सूचक वक्तव्य केले होते. त्याचा अर्थ आजच्या भेटीशी जोडला जात आहे. आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत नागपूरजवळच्या सावनेर मतदारसंघातून आशिष देशमुख यांना भाजपचं तिकीट मिळणार का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे. कारण आशिष देशमुख यांना काँग्रेसमधून तात्पुरते निलंबित केले आहे. तसेच, सावनेरमध्ये सध्या भाजपचा आमदार व तगडा उमेदवारही नाही. त्यामुळे यंदा देशमुखांना संधी मिळणार, अशी चर्चा सुरु आहे.
२०१४च्या विधानसभा निवडणुकीत आशिष देशमुख भाजपच्या तिकिटावर काटोलमधून लढले होते आणि तेथे त्यांचे काका माजी मंत्री अनिल देशमुख यांचा त्यांनी पराभव केला होता. त्यानंतर ते भाजपमध्ये रमले नाही आणि स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. कॉंग्रेसमध्येही त्यांचे फार काळ जमले नाही आणि त्यांनी थेट श्रेष्ठींसोबत पंगे घेणे सुरू केले.
भाजप प्रवेश होणार?
आशिष देशमुख यांनी त्यांचे वडील रणजीत देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त, 29 मे रोजी सावनेर मध्ये अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला आहे. सावनेर हा रणजीत देशमुख यांचा जुना मतदारसंघ असून सुनील केदार यांच्यापूर्वी रणजीत देशमुख हेच सावनेरचे आमदार होते. 1996 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून सुनील केदार यांनीच रणजित देशमुख यांचा पराभव केला होता. यामुळे सावनेरमधील देशमुख कुटुंबीयांची सत्ता खालसा झाली होती. 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आशिष देशमुख हे सुनील केदार यांच्याविरोधात उभे राहणार का, ते पाहावं लागेल. काही दिवसांपूर्वी देशमुख यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे सावनेरचं राजकारण आगामी काळात कुठलं वळण घेतं ते पाहायचं.