दिव्यांगांच्या अनुदान वाढीसाठी पाठपुरावा करणार !

0

देशातील सर्वोत्तम कार्य चंद्रपुरात करून दाखविणार

वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही

चंद्रपूर : दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय असणारे देशातील महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. परंतु त्यानंतरही दिव्यांगांना मिळणारे अनुदान त्यातुलनेत कमी आहे. हे अनुदान वाढावे यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करू व ते जोवर वाढत नाही तोवर स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

विकलांग एकता शक्ती संघटनद्वारा बल्लापूरच्या खांडक्या बल्लाळशाह नाट्यगृहात आयोजित तालुकास्तरीय विकलांग मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ नेते तथा वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, लखनसिंग चंदेल, बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, भाजप शहराध्यक्ष काशी सिंग, माजी नगरसेवक अरुण वाघमारे, मुख्याधिकारी विशाल वाघ, अर्चना मानलवार, प्रदीप लांडगे, प्रतिक नगराळे, प्रफुल्ल भोयर, अरुणा राजूरकर, कल्पना कोकस, नंदिनी पांदळे उपस्थित होते.

ना.मुनगंटीवार म्हणाले, देशातील दिव्यांगांसाठी सर्वोत्तम कार्य चंद्रपूर जिल्ह्यात करून दाखवायचे आहे. त्यासाठी दिव्यांग प्रवर्गातील पाच ते सहा जणांना एकत्र करत,दिव्यांग बांधवांची समस्या जाणून त्यांना सोबत घेऊन काम करणार आहे. दिव्यांगांच्या समस्या केवळ जाणुनच घेणार नाही तर त्या सोडविण्यासाठी व्यापक पुढाकार घेणार आहे. आमदार असताना आता सांसदीय आयुधांचा वापर करून अंध आणि दिव्यांगांचे प्रश्न मांडले. सर्वप्रथम वरोरा येथील आनंदवनात तयार झालेल्या १०० तीनचाकी सायकलिंचे वाटप केले . निराधारांचे अनुदान वाढविण्यासाठी सतत संघर्ष केला. ६०० वरुन हे अनुदान १,२०० रुपये पर्यंत वाढविले गेले ते आपल्याच अर्थमंत्री असतानाच्या काळात. दिव्यांगांसाठी स्वत: लिहिलेले ‘अपंगांचा आधार’ या पुस्तकाचा त्यावेळी दिव्यांगांना उपयोग झाल्याच्या स्मृती त्यांनी ताज्या केल्या.

दिव्यांगांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे असल्याचे नमूद करीत ना.मुनगंटीवार म्हणाले. सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिव्यांगांच्या कल्याणासाठी पाच टक्के निधी आरक्षित असतो. तो कायम त्यांच्या कार्यासाठीच आरक्षित ठेवला जावा. त्याचा विनियोग त्यांच्यासाठीच केला जावा. दिव्यांगांसाठी अनेक योजना आहेत. परंतु हा प्रवर्ग संघटित नसल्याने त्याची व्यापक माहिती, प्रचार-प्रसार होत नाही. त्यामुळे राज्यस्तरावर दिव्यांगांची माहिती अद्ययावत करणे नितांत गरजेचे आहे. ऑनलाईन पोर्टल स्वरुपात जिल्हानिहाय दिव्यांगांची नावे, त्यांच्या कौशल्याची माहिती तेथे असावी. दिव्यांगांसाठी असलेल्या योजनांची संपूर्ण व विस्तृत माहिती, ऑनलाईन अर्ज प्रणाली तेथे असणे काळाची गरज आहे.

कोणताही रोजगार सुरू करण्यासाठी बँकेतून हमीपत्र मागितले जाते. परंतु दिव्यांगांना हमीपत्राशिवाय बँकेतून आर्थिक सहाय्य दिले जाणे गरजेचे आहे. यासाठी केंद्रीय मंत्री भागवतजी कराड यांच्या उपस्थितीत दिव्यांग संमेलन घेण्याची घोषणा ना. मुनगंटीवार यांनी केली. संमेलनात दिव्यांगांचे हक्क, त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहिती आणि बँकेतून अर्थसहाय्यासाठी असेल असे ते म्हणाले.

विविध कंपन्यांचा सीएसआर निधी दिव्यांगांच्या कल्याणासाठी खर्च व्हावा यासाठी आपण प्रयत्न करू असेही ते म्हणाले. एखादा व्यक्ती अपघाताने दिव्यांग झाला तर ती सामाजिक चूक असते. त्यामुळे समाजाने केलेली ही चूक सुधारण्यासाठी दिव्यांगांना मदतीचा हात पुढे करण्याची जबाबदारीही समाजाने स्वीकारली पाहिजे, असे ठाम मत राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. दिव्यांगांच्या प्रेमाचे कर्ज आपल्यावर आहे. या कर्जाची व्याजासह परतफेड करण्यासाठी आपण दिव्यांगांच्या कल्याणार्थ निश्चित कार्य करू याचा पुनरूच्चार त्यांनी केला.

 

पनीर चिंगारी आणि ब्रेड पकोडा Ep.no 77 | Paneer Chingari & Bread Pakoda | Shankhnaad khadyayatra