नवी दिल्ली : देशभरात ७४व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळत असून त्यानिमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तथापि, या कार्यक्रमांचा केंद्रबिंदू असलेल्या राजधानी नवी दिल्ली येथील कर्तव्यपथावर यंदाही अत्यंत नेत्रदीपक पथसंचलानाचे आयोजन करण्यात आले. गेल्या वर्षी राजपथचे नामकरण ‘कर्तव्य पथ’ करण्यात आल्यानंतर हा पहिला प्रजासत्ताक दिन सोहळा होता.
देशाचे संरक्षण सामर्थ्य व सांस्कृतिक परंपरेचे प्रदर्शन या पथसंचालनाच्या निमित्ताने करण्यात आलरे. यंदा पथसंचलनात पुन्हा एका महाराष्ट्राचा चित्ररथ चर्चेचा विषय ठरला.(74th Republic Day 2023 Parade). इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल सिसी हे यावर्षी प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे आहेत. विशेष म्हणजे मागील काही वर्षांपासून सुरु झालेल्या परंपरेप्रमाणे यंदाही प्रमुख पाहुण्यांच्या देशातील लष्कराची तुकडीही या पथसंचलनात सहभागी झाली होती.
महाराष्ट्राचा चित्ररथ
यावर्षीच्या पथसंचलनात १७ राज्ये आणि दहा विविध केंद्रीय मंत्रालयांनी मिळून २७ चित्ररथ कर्तव्यपथावर सादर केले होते. त्यात महाराष्ट्राच्या वतीने महाराष्ट्रातील प्रसिद्ध “साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती” या संकल्पनेवर आधारीत चित्ररथ सादर करण्यात आला. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता हे तीन पूर्ण शक्तीपीठे आहेत. तर वणीची सप्तश्रृंगी हे अर्धे शक्तिपीठ आहे. या शक्तिपीठांचे दर्शन आज दिल्लीतील पथसंलनात सर्वांना घेता आले. महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या पुढील दर्शनीय भागात गोंधळी संबळ वाद्य वाजवित असल्याची मोठ्या प्रतिकृतीचा समावेश होता. तर डाव्या व उजव्या भागास पारंपरिक वाद्य वाजविणारे आराधी, गोंधळी यांच्या प्रतिमा आहेत. त्यामागे शक्तिपीठांची मंदिरे असून त्यात देवींच्या प्रतिमांचा समावेश होता.
विशेष निमंत्रितांची चर्चा
यंदाच्याप्रजासत्ताक दिनाचे वेगळेपण म्हणजे दिल्लीच्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पासाठी योगदान देणारे कामगार आणि त्यांच्या कुटुंबीय, कर्तव्यपथाचे देखभाल करणारे कामगार, भाजी विक्रेते, दूध बुथ कामगार, किराणा दुकानदार आणि रिक्षाचालक यांना “विशेष निमंत्रित” म्हणून सन्मान देण्यात आला होता.
विमानांच्या कसरती
कर्तव्यपथावरील फ्लायपास्टमध्ये यंदा भारतीय वायुसेनेची ४५ विमाने, भारतीय नौदलातील एक आणि भारतीय लष्कराच्या चार हेलिकॉप्टरचा सहभाग होता. रफाल, मिग-29, सुखोई-30 एमकेआय, जग्वार, सी-130, सी-17, डॉर्नियर, डकोटा, एलसीएच प्रचंड, अपाची, सारंग ही विमाने व हेलिकॉप्टर फ्लायपास्टमध्ये सहभागी झाली होती.
पंतप्रधानांचा पेहराव
नरेंद्र मोदींचा खास पेहराव
प्रजासत्ताक दिनानिमित्त यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विशेष पेहरावात आढळून आले. मोदी यांनी बहुरंगी राजस्थानी पगडी, क्रिम कलरचा कुर्ता, ब्लॅक जॅकेट, पांढऱ्या रंगाचा स्टोल आणि काळे शूज असा पेहराव केला होता. पथसंचलन सुरु होण्यापूर्वी पंतप्रधानांनी नॅशनल वॉर मेमोरियल येथे जाऊन (National War Memorial) शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली.
पनीर चिंगारी आणि ब्रेड पकोडा Ep.no 77 | Paneer Chingari & Bread Pakoda | Shankhnaad khadyayatra