संजय राऊत पुन्हा अडचणीत येणार? जारी झाले अजामीनपात्र वॉरंट

0

मुंबईः शिवसेना खासदार संजय राऊत हे पुन्हा एकदा अडचणीत येणार की काय अशी परिस्थिती निर्माण होत आहे. एका मानहानीच्या प्रकरणात संजय राऊत यांच्या विरुद्ध शिवडी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी (Non bailable warrant issued against Sanjay Raut) केला आहे. याप्रकरणी शिवडी कोर्टात पुढची सुनावणी २४ जानेवारीला होणार आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी संजय राऊतांविरोधात मानहानीचा आरोप करीत थेट कोर्टात खटला दाखल केला होता. मेधा सोमय्या यांनी कथित शौचालय घोटाळा प्रकरणी संजय राऊतांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शंभर कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप केला होता. यात त्यांनी सोमय्या यांच्या पत्नीवर आरोप लावले होते. त्यावरून मेधा सोमय्या यांनी शिवडी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणात राऊत हे जबाब नोंदविण्यासाठी मागील सुनावणीला न्यायालयात हजर झालेले नव्हते. त्यामुळे त्यांना जबाब नोंदवण्यासाठी हजर करण्याचे आदेश ईडीला द्यावेत, अशी मागणी मेधा सोमय्या यांनी न्यायालयाकडे केली होती. या प्रकरणाची सुनावणी २४ जानेवारीला होणार आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा