ढगाळ वातावरण, थंडीही कायम, तर विदर्भात पावसाची शक्यता

0

राज्याचापारा कालपासून चांगलाच कमी झाला आहे यामुळे राज्यातील बऱ्याच शहरात आणि ग्रामीण भागातील नागरिकांना गुलाबी थंडीचा अनुभव घेता येत आहे. मागचे दोन दिवस ढगाळ वातावरण असल्याने विदर्भ आणि मराठावाड्यातील काही भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या होत्या. दरम्यान नागपूरमध्ये पाऊस तर पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात कडाक्याची थंडी पडल्याचे दिसून आले. यामुळे अनेक ठिकाणी, चौकाचौकांत शेकोट्यांच्या भोवती नागरिक उभे असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

राज्यात धुळे, जळगाव, नाशिक, सातारा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये तापमान कमी झाले आहे. मुंबई आणि पुण्यातही पारा घसरल्याने लोक थंडीचा आनंद घेत आहेत. मुंबईत 15 ते 20 अंशांच्या आसपास पारा घसरला होता. दरम्यान मुंबईत थंडी पडत असली तरी वातावरणात धुळीचे कण वाढल्याने एअर क्वालिटी बिघडली होती. उत्तर, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रातही थंडीनं चांगला जोर धरला असून, पुढल्या काही दिवसांमध्ये हीच परिस्थिती कायम असण्याची शक्यता आहे.

बुलढाणा, गोंदिया, हिंगोली या भागांमध्ये मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे याचे थेट परिणाम येथील पिकांवर होण्याची शक्यता आहे. इतकंच नव्हे, तर राज्याच्या या भागातील काही ठिकाणांवर पावसाची शक्यता आहे. पिकांना बहर आलेला असतानाच पावसाने हजेरी लावल्यास पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

आज (ता. 06) राजस्थानाच्या काही भागांत थंडीची तीव्र लाट, तर पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यात थंडीची लाट कायम राहून, थंड दिवस अनुभवायला मिळणार आहे. उत्तर भारतासह आणि ईशान्येकडील राज्यात दाट धुक्याची स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा