कसबा मतदारसंघात भाजपकडून शैलेश टिळक यांना संधी मिळणार?

0

पुणेः पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून शैलेश टिळक यांना संधी दिली जाणार असल्याचे संकेत मिळत (Kasba Assembly By Election) आहेत. शैलेश टिळक हे दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती आहेत. यासंदर्भात भाजपकडून येत्या दोन दिवसात त्यांच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त जागेवर पोटनिवडणूक होत आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु असून सध्यातरी महाविकास आघाडीने या प्रयत्नांना दाद दिलेली नाही. कसब्यातून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे तिन्ही पक्ष निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत.
कसबा व चिंचवड या दोन मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. त्यापैकी कसब्यात शैलेश टिळक यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. काल टिळक यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. कसबा मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन भाजपने सर्वपक्षीयांना केले आहे. मात्र, महाविकास आघाडीने त्याला तुर्तास नकार देत लढण्याचा इरादा जाहीर केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षांनी ही निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. चिंचवडमधून भाजप नेमक्या कोणाला संधी देणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला संधी दिली जाणार की कसे, याकडे लक्ष लागलेले आहे. पक्ष जो निर्णय घेईल, त्याला आमचा पाठिंबा राहील, अशी घोषणा यापूर्वीच जगताप कुटुंबीयांनी केली आहे