सिंगापूरमध्ये दोन दशकानंतर महिलेला फाशी देणार

0

सिंगापूर Singapore : सिंगापूरमध्ये तब्बल दोन दशकांनंतर एका महिलेला फाशीची शिक्षा ठोठावली जाणार असून ही महिला अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात दोषी आढळून आली आहे. या प्रकरणातील दोन आरोपींना फाशीची शिक्षा दिली जाणार असून त्यात या महिलेचा समावेश आहे. सिंगापूरमध्ये 20 वर्षानंतर महिलेला फाशीची शिक्षा देण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक मानवाधिकार संस्थेकडून देण्यात आली आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी (Drugs) दोषी ठरलेल्या 45 वर्षीय महिलेला शुक्रवारी फाशी देण्यात येणार असून तिचे नाव सारीदेवी जमानी असे आहे.

सुमारे 30 ग्रॅम हेरॉइनची तस्करी केल्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर तिला 2018 मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. यापूर्वी २००४ मध्ये एका ३६ वर्षी महिलेला अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात फाशी देण्यात आली होती. अंमली पदार्थ विरोधातील सर्वात कठोर कायदा सिंगापूरमध्ये आहे. 500 ग्रॅमपेक्षा जास्त गांजा किंवा 15 ग्रॅमपेक्षा जास्त हेरॉइनची तस्करी करताना आढळल्यास तेथे मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती दिली जात आहे.