“होय, पटोलेंनी विधानसभाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसता तर…” राष्ट्रवादीनेही फोडले खापर

0

मुंबईः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर आता चौफेर टीका होऊ लागली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीपासून स्वपक्षीय नेत्यांच्या रडारवर असलेल्या पटोलेंवर आता महाविकास आघाडीतील घटकपक्षही टीका करू लागले आहेत. नाना पटोले यांनी विधानसभाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसता महाविकास आघाडी सरकार पडले नसते, या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विधानाचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Former Home Minister Dilip Walse Patil) यांनी समर्थन केले आहे. वळसे पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये या विषयावर चर्चा व्हायला हवी होती. वास्तविक पटोलेंनी त्यावेळी अध्यक्ष पद सोडायला नको होते. त्यांनी जर अध्यक्षपद सोडले नसते तर हे सर्व घडले नसते. मात्र, आता यावर सार्वजनिक चर्चा करणे योग्य नाही.

 

आमच्या पातळीवर आम्ही चर्चा करु. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांवर मी जास्त बोलू शकत‌ नाही, असे वळसे पाटील म्हणाले.
नाना पटोले यांनी विधानसभेचे अध्यक्षपद सोडल्यानंतर राज्यात शिवसेनेत बंडाळी होऊन सरकार पडले. विधानसभा अध्यक्ष नसल्याने बंडखोर आमदारांना अपात्र घोषित करण्याचा तांत्रिक प्रश्न उपस्थित झाला, असा दावा ठाकरे सेनेकडून करण्यात आला. त्याला माजी मंत्री व काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी समर्थन दर्शविले. त्यांनीही पटोले यांनी अध्यक्षपद सोडायला नको होते, असा अभिप्राय दिला. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून वळसे पाटील यांनीही या विधानाचे समर्थन केले आहे. दरम्यान, सर्वप्रथम आमदारांच्या निलंबनावर ‌निर्णय व्हायला हवा. न्यायालयात यावर ताबडतोब सुनावणी होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा