मुंबईः शिवसेनेत बंडखोरी होऊन पन्नास आमदार गुवाहाटीला पोहोचले. त्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार पडून शिंदे सरकार स्थापन झाले. आता शिंदे गट गुवाहाटीत जाऊन कामाख्या देवीचा नवस फेडणार आहे. 26 आणि 27 नोव्हेंबर रोजी गुवाहाटी दौरा (Shinde Camp to tour Guwahati) होणार असून नवस फेडण्यासाठीच हा दौरा आखल्याची माहिती शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदे गुवाहाटीचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि पोलिस आयुक्तांना भेटणार आहेत. जून महिन्यात राज्यातील राजकीय घडामोडींच्या काळात शिंदे गटाला आसाममधील ज्या व्यक्तींनी मदत केली अशा सर्वांची हा गट भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या दौऱ्यात कामाख्या देवीच्या मंदिरात शिंदेंकडून विशेष पूजेचे नियोजन करण्यात आले आहे. आमची इच्छा पूर्ण झाल्यामुळे देवीच्या दर्शनाला जाणार असल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. राज्यामध्ये सत्ता आली तर सर्वांना घेऊन दर्शनाला येईन,’ असा नवस शिंदे बोलले होते. तो फेडण्यासाठी शिंदे आता गुवाहाटीला जाणार आहेत. सुरुवातीला या दौऱ्यासाठी वेगळी म्हणजे २१ नोव्हेंबर ही तारीख देण्यात आली होती. मात्र, आता प्रताप सरनाईक यांनी हा दौरा 26 आणि 27 नोव्हेंबरला होणार असल्याचे सांगितले.
अनेक तर्कवितर्क
दरम्यान, हा पुढे ढकलल्याचीही चर्चा होती. शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याची, तर काहींना गुवाहाटीत जाण्याची इच्छा नसल्याचे दावेही करण्यात आले होते. कामाख्या देवीला रेड्याचा बळी देण्यास काहींचा विरोध असल्याचे कारणही चर्चेत होते. मात्र, हा दौरा निश्चित असल्याचे संगितले जात आहे.