
अतिरिक्त सुरक्षा ठेवीची बिले ग्राहकांच्या माथी
ग्राहकांना पुरविल्या जाणाऱ्या विजेच्या दरासंदर्भात आधीच सर्वधू नाराजीचा सूर उमटत असताना आता अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या नावाखाली अतिरिक्त आकड्यांची बिले ग्राहकांच्या माथी मारण्याचा नवीन प्रकार महावितरण कंपनीने आरंभला आहे.
मागील काही वर्षात महाराष्ट्रात विजेचे दर बऱ्याच अंशी वाढले आहेत. एक ते शंभर युनिट पर्यंत सुमारे ४ प्रति युनिट प्रमाणे दर आकारले जातात. १०१ ते ३०० युनिट पर्यंत हा दर प्रति युनिट ११ रुपयांच्या घरात जातो. ३०१ ते ५०० युनिट पर्यंत वीज वापरल्यास प्रति युनिट १५ रुपयांचा दर आकारणी ग्राहकांना विजेचे बिल पाठविले जाते.
वीज दराचा हा भाग दिवसागणिक वाढतच चालला असताना आता ग्राहकांना लूटण्याची नवीन चाल महावितरण कंपनीने केली आहे. मागील काही दिवसांपासून अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या नावाखाली रुपये ७६० किंवा त्यापेक्षा अधिक रुपयांची अतिरिक्त बिले एप्रिल महिन्याच्या मासिक बिलासोबत कुठलीही पूर्वसूचना न देता किंवा ग्राहकांना ही सुरक्षा ठेव द्यायची इच्छा आहे किंवा नाही याबाबत त्यांची मतं जाणून न घेता हे बिल सरळ ग्राहकांना पाठविले जात आहे.
एखादा ग्राहक ज्यावेळी नवीन वीज जोडणीची मागणी करतो त्याचवेळी त्याच्याकडून ही सुरक्षा ठेव व अन्य विविध खर्चाची आकारणी केली जाते. त्याप्रमाणे पैसे भरल्यावरच त्याला वीज जोडणी प्रदान केली जाते. असे असताना आता मध्येच अतिरिक्त सेक्युरिटी डिपॉझिट चा हा डाव नेमका कशासाठी केला जातोय हे कळायला मार्ग नाही. मात्र यंदा संपूर्ण राज्यात महावितरण कंपनीने ग्राहकांवर अशी अतिरिक्त रकमांची बिले अक्षरशः लादली आहेत. ग्राहकांनी ही अतिरिक्त रक्कम का व कशासाठी द्यायची, असा प्रश्न ग्राहक विचारू लागला आहे. मात्र ग्राहकांच्या हितासाठी काम करणे अपेक्षित असलेल्या एम ईआरसी सारख्या कंपन्यांचे अधिकारीही मूग गिळून गप्प बसले असल्याने ग्राहकांवरचा हा अन्याय सहज खपून जाणार असेच दिसते. वीज बिलांचा भरणा करण्यास दोन दिवसांचाही विलंब झाला तर वीज कनेक्शन कापायला तत्पर असणाऱ्या वीज कंपन्यांच्या खिशात या अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या रकमा का म्हणून घालायच्या असाही प्रश्न आता उपस्थित झाला आहे. मात्र जनतेला व ग्राहकांना वालीच नसल्याने, ही अतिरिक्त बिले त्यांच्या बोकांडी बसणारच असेच चित्र आहे.
















