नव्या ‘हिट अँड रन कायद्या’विरोधातील ट्रक चालकांच्या आंदोलनाचे आज देशाच्या आठ राज्यांमध्ये तीव्र पडसाद उमटले. मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब अन् गुजरातमध्ये या आंदोलनाचा प्रभाव जाणवत आहे. राज्यामध्येही विविध शहरांत झालेल्या या आंदोलनाचा मोठा फटका सार्वजनिक वाहतुकीला बसला. मुंबई, ठाणे, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नाशिक, कोल्हापूर आणि सांगलीमध्ये चालकांनी आंदोलन केले. तो कायदा काय आहे, त्यामध्ये काय बदल झाला आहे, कायद्यात बदल केल्यानंतर चालक का आक्रमक झाले आहेत, त्याचबरोबर याचा काय परिणाम आहे याबाबत आपण जाणून घेऊयात.
नवीन कायदा काय?
यामध्ये आता अपघात झाल्यानंतर पळून जाणे हे हिट अँड रन समजले जाते. तर आतापर्यंत या प्रकरणामध्ये दोन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद करण्यात येत होती आणि जामीनही मिळत होता. बदलत्या नव्या नियमानुसार जर कोणी वाहनाला धडक दिली आणि चालक पोलीस प्रशासनाला न सांगता घटनास्थळावरून पळून गेला, तर त्याला 10 वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा आणि दंडही ठोठवला जाणार आहे. या कायद्याला चुकीचे ठरवत देशभरातून आंदोलन केले जात आहे.
पळ काढला तर…
हिट अँड रन प्रकरणांमध्ये सरकारी आकडेवारीनुसार दरवर्षी 50 हजार लोकांचा रस्त्यावर मृत्यू होतो. त्याविषयी गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत सांगितले की, नवीन कायद्यात सरकार हिट अँड रन प्रकरणांमध्ये कठोर तरतुदी करत आहे. या कायद्याअंतर्गत एखाद्या कारने एखाद्याला धडक दिली व अपगाघग्रस्त व्यक्तीला मदत करण्याऐवजी चालकाने तिथेच टाकून पळ काढला. ती व्यक्ती मृत्यूमुखी पडली तर त्या चालकाना 10 वर्षांचा तुरुंगवास आणि दंड भरावा लागणार आहे. तर जे चालक अपघातग्रस्त व्यक्तीला रुग्णालयात घेऊन जातात किंवा अपघात झाल्यानंतर पोलिसांना अपघाताची माहिती देतात त्यांना मात्र त्यातून दिलासा मिळणार आहे. आजपर्यंत याबाबतची आयपीसीमध्ये अशी तरतूद करण्यात आली नव्हती.
10 वर्षांचा तुरुंगवास
या कायद्याविषयी बोलताना वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे की, हा कायदा म्हणजे दुधारी तलावार आहे. अपघात झाल्यानंतर एखादा वाहनचालक मदत मागण्यासाठी थांबला असला तरी त्याच्यावर जमावाकडून हल्ला होण्याचा धोका असू शकतो. या प्रकारचे अपघात झाले तर अशा वेळी जमाव हिंसक झालेला असतो. मात्र वाहनचालक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळून गेला तर मात्र त्याला कायद्यानुसार 10 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. त्यामुळे अशा अपघातांचा वाईट परिणाम वाहनचालकाच्या आयुष्यावर होणार आहे.त्यामुळे याच्या निषेधार्थसाठीच बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा दिल्ली आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्यात ट्रक चालकांकडून जोरदार आंदोलन केले जाता आहे.
वाहनचालकांना दिलासा
या कायद्याविषयी चालकांकडून जोरदार आंदोलन केले जात असले तरी नव्या कायद्यानुसार अपघातग्रस्त व्यक्ती चुकीच्या पद्धतीने वाहनासमोर आली, किंवा बेकायदेशीरपणे रस्ता ओलांडत असेल तर अशा वेळी वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. या प्रकरणात 5 वर्षांची शिक्षा आणि त्याचबरोबर दंडही होणार आहे. तर चुकीच्या पद्धतीने वाहन चालवल्यास मात्र 10 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा मिळणार आहे.
चूक नसतानाही मोठी शिक्षा
कायद्यातील या तरतुदीमुळेच वाहनचालक चिंता व्यक्त करत आहेत. धुक्यामुळेही अनेक अपघात होऊन विपरित घटना घडत आहेत. त्यामुळे असे अपघात झाले तर मात्र कोणतीही चूक नसताना एखाद्या वाहनचालकाला मोठी शिक्षा भोगावी लागणार असल्याचे मत वाहनचालकांमधून व्यक्त होत आहे.
काय आहे ‘हिट अँड रन’ नवीन कायदा?
केंद्र सरकारच्या माध्यमातून मोटार वाहन कायदा पारित करण्यात आला आहे. नवीन कायद्यानुसार वाहनचालक अपघात करून फरार झाल्यास तसेच प्राणघातक अपघाताची माहिती पोलिसांना न दिल्यास चालकांना 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास होण्याच शक्यता आहे. यापूर्वी, आयपीसी कलम 304A अंतर्गत आरोपीला फक्त दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागत होता. सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकारण्यात येणार आहे. यालाच हिट-अँड-रन कायदा असे म्हटले आहे.
यापूर्वी या प्रकरणात आरोपी चालकाला काही दिवसांत जामीन मिळायचा आणि तो पोलिस ठाण्यातूनच बाहेर पडत असे. मात्र, या कायद्यांतर्गत दोन वर्षांच्या तुरुंगवासाचीही तरतूद होती.
________________________________________________________________________
ट्रक चालकांचे म्हणणे आहे की, “कोणीही ड्रायव्हर जाणून बुजून अपघात घडवत नाही, तसेच जखमींना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केल्यास तेथे जमलेला जमाव त्यांना मारहाण करेल”, तेव्हा ट्रक चालक संघटनांकडून हा ‘काळा कायदा’ रद्द करण्याची मागणी केली जात आहे. तसेच अनेकदा वातावरणात धुक्याची चादर पसल्याने गाडी चालकांना समोरचे दृश्य दिसत नाही, अशावेळी अनेक अपघात होतात. परंतु या परिस्थितीमुळे जर चालकाच्या हातून अपघात झाला तरी त्याला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठवली जाऊ शकते, अशी भीतीही ट्रक आणि बसचालकांनी व्यक्त केली.
















