महिला महाविद्यालयातील 10 आदिवासी मुलींना शिक्षणासाठी घेतले दत्‍तक

0

नागपूर,
स्‍त्री शिक्षण प्रसारक मंडळ संचालित महिला महाविद्यालयात ‘टिच हर’ योजनेअंतर्गत शिकत असलेल्‍या आदिवासी भागातील 10 मुलींना मोहगाव झिल्‍पी श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्‍टने शिक्षणासाठी दत्‍तक घेण्‍यात आले आहे. श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्‍टचे अध्‍यक्ष संदीप जोशी यांनी पुढाकार घेत या मुलींच्‍या शिक्षणाचा खर्च उचलण्‍याची जबाबदारी घेतली. त्‍यासंदर्भात पत्र महिला महाविद्यालयाच्‍या प्राचार्य श्रीमती वंदना भागडीकर यांनी संदीप जोशी यांना प्रदान केले.
‘मुलींचा सर्वांगीण विकास साधत राष्‍ट्रविकासाचा पाया मजबूत करण्‍याच्‍या उद्देशाने मह‍िला महाविद्यालयामध्‍ये ‘टीच हर’ हा प्रकल्‍प राबवला जातो. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील मुलींच्‍या शिक्षणाबरोबरच पालनपोषण, त्‍यांच्‍यातील सुप्‍त कलागुणांना वाव देणाच्‍या व त्‍यांचे भविष्‍य उज्‍ज्‍वल करण्‍यासाठी महिला महाविद्यालयाद्वारे प्रयत्‍न केले जातात. सध्‍या गडचिरोली जिल्ह्यातील 44 गरजू होतकरू विद्यार्थिनी या प्रकल्‍पांतर्गत नागपुरात शिक्षण घेत आहेत.
संदीप जोशी यांनी दहा मुलींचे भविष्‍य घडवण्‍यासाठी श्री. सिद्धीविनायक ट्रस्‍ट कसोशीने प्रयत्‍न करेल, असे आश्‍वासन दिले तर प्राचार्य वंदना भागडीकर यांनी त्‍यांचे आभार मानले.