नवी दिल्लीः तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी आमदार के कविता दिल्लीतील ईडी कार्यालयात दाखल झाल्या असून त्यांची दिल्ली मद्य धोरण प्रकरणात चौकशी सुरु झाली आहे. या प्रकरणात ईडी त्यांना अटक करू शकते, असे संकेत मिळत (KCR Daughter Kavitha ED Enquiry) आहेत. मुख्यमंत्री केसीआर यांनी आपल्या मुलांना दिल्लीला पाठवले आहे. केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप कविता यांनी केला आहे. मी तपासात पूर्ण सहकार्य करेन, असे कविता यांनी सांगितले. यापूर्वी डिसेंबर महिन्यात सीबीआयने कविता यांची सुमारे सात तास चौकशी केली होती. दरम्यान, हैदराबादमध्ये भाजपला लक्ष्य करणारे एक पोस्टर्स लावण्यात आले आहेत.
दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी केसीआर यांनी पक्षाची बैठक घेतली होती. त्या बैठकीत त्यांनी चौकशीनंतर ईडी कविता यांना अटक करू शकते, अशी भीती व्यक्त केली होती. आपण मागे हटणार नसून हा लढा दिल्लीपर्यंत नेणार असल्याचे केसीआर यांनी यावेळी सांगितले.
दिल्ली मद्य धोरण प्रकरणातील मनी लॉन्ड्रिंगच्या तक्रारींची ईडी चौकशी करत आहे. मंगळवारी दिल्ली न्यायालयाने हैदराबादचे व्यापारी अरुण रामचंद्रन पिल्लई यांना 13 मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले. अरुण हे के कविता यांच्या जवळचे मानले जातात. पिल्लई यांनी दारू धोरणात बदल करण्यासाठी आम आदमी पक्षाला 100 कोटी रुपये पाठवल्याचा आरोप आहे. ईडीचा आरोप आहे की, के कविता ‘दक्षिण कार्टेल’चा एक भाग आहे, ज्यांनी लाच देऊन दिल्लीचे मद्य धोरण बदलून पैसे कमवले. लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांनी दिल्लीच्या दारू धोरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते.