नागपूर – समृद्ध इतिहास, संस्कृती, परंपरा आणि पर्यटनदृष्टया समग्र विकासाचा वेध घेणाऱ्या रायझिंग नागपूर या सचित्र माहिती पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी मुंबईत पार पडले.
विधानभवनाच्या समिती कक्षात हा प्रकाशन सोहळा पार पडला.मुख्यमंत्री आणि उपुख्यमंत्री यांनी पुस्तकाची मांडणी व प्रकाशनाच्या औचित्या विषयी कौतुक केले. याप्रसंगी खासदार कृपाल तुमाने, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार,मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, माहिती संचालक हेमराज बागुल,सह आयुक्त अविनाश कातडे, सहसंचालक राजेंद्र लांडे आदी उपस्थित होते.
जी-20 परिषदेंतर्गत नागपूर येथे सी-20 परिषद आयोजित होत आहे. या परिषदेसाठी विविध देशांचे प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. उपस्थित प्रतिनिधींना नागपूर जिल्हा व शहराची ओळख व्हावी या दृष्टीने जिल्ह्याची सचित्र पुस्तिका तयार करण्यात आली आहे .
या पुस्तकात नागपूर जिल्हा व शहराविषयी ओळख यामध्ये इतिहास सामाजिक जीवन व उत्सव वारसा स्थळांची माहिती झिरो माइल नागपूर शहरातील ऐतिहासिक इमारती धार्मिक स्थळे पुतळा तलावावरील आकर्षक रंगीत कारंजे वन पर्यटन टायगर कॅपिटल कृषी उद्योग एज्युकेशन हब यासंदर्भातील माहिती आकर्षक स्वरूपात इंग्रजी भाषेत सचित्र देण्यात आली आहे. त्यामुळे जी २० साठी नागपुरात येणाऱ्या पाहुण्यांना निश्चितच पुस्तक उपयुक्त ठरणार आहे.
या पुस्तकाची निर्मिती नागपूर महानगर विकास प्राधिकरण तर्फे करण्यात आली आहे. प्राधिकरणाचे नागपूर सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यांनी स्वागत करून रायझिंग नागपूर या पुस्तिकेच्या माध्यमातून नागपूर ऑरेंज सिटी व टायगर कॅपिटल म्हणून ओळख निर्माण झालेल्या शहर व जिल्ह्यांच्या इतिहास संस्कृती व पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण माहिती परिषदेच्या सदस्यांना उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.
या पुस्तिकेची निर्मिती व संपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी केले असून मांडणी व सजावट विवेक रानडे यांचे आहे.यावेळी पुस्तकाच्या निर्मिती बद्दल अनिल गडेकर व विवेक रानडे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. निर्मिती साठी सह आयुक्त अविनाश कातडे,महाव्यवस्थापक निशिकांत सुके यांनी मार्गदर्शन केले.