रताळी येथे वीज कोसळून 16 शेळ्या ठार

0

अवकाळीचा तडाखा सुरूच

बुलढाणा :  अवकाळी पावसाने विदर्भावर कररच केला आहे. एप्रिल महिन्यात तब्बल 21 दिवस पावसाने हजेरी लावली. यात शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भर उन्हाळ्यात पावसाचा मारा सोसावा लागत आहे. त्यासोबतच वादळ, गारपीठ, विजांच्या कडकडाटाने साऱ्यांनाच जेरीस आणले आहे. अवकाळी पावसामुळे विदर्भात सर्वदूर नुकसान सुरू आहे. बुलढाणा येथील रताळी गावातही मोठा अनर्थ टळला. निंबाच्या झाडाखाली उभ्या असलेल्या शेळ्यांच्या अंगावर वीज कोसळली़. यामध्ये 16 शेळ्या जागीच ठार झाल्या़. रविवारी सकाळी 9 वाजता ही दुर्दैवी घटना घडली. जवळच शेतमालक आणि पशुपालक देखील उभे होते. पण, पावसापासून बचावासाठी त्यांनी जवळच उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीखाली आश्रय घेतला होता. यामुळे ते दोघेही बालंबाल बचावले.

रताळी येथील शशिकला तेजराव आव्हाळे व शेतमालक भिकाजी सखाराम जाधव यांनी रविवारी सकाळी 9 वाजता शेळ्यांचा चरण्यासाठी सोडले होते़. त्याचवेळी अचानक अवकाळी पाउस सुरू झाला. त्यामुळे, सर्व शेळ्या निंबाच्या झाडाखाली थांबल्या. पावसादरम्यान वीज झाडावर कोसळल्याने 16 शेळ्यांचा जागीच दगावल्या. या घटनेत जाधव यांचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. माहिती मिळताच तलाठी शेळके व पोलिस विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या घटनेत नुकसान झालेल्या जाधव यांना शासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी सरपंच उषा समाधान पाटील यांनी केली आहे.

सर्वत्र नुकसान सुरू असले तरी पाऊस काही केल्या उसंत घ्यायला तयार नाही. हावामान विभागाने 5 मे पर्यंत पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. सततच्या पावसामुळे शेतातील मशागत पूर्व कामे देखील खोळंबली आहेत. भर उन्हाळ्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे खरीप हंगामावरही परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते आहे.