शिक्षण, संस्कार, सेवा हा मानवी मूल्यांचा पाया

0

ग्रामगीताचार्य राधेश्याम निमजे : विद्यापीठाकडून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अभिवादन

 

नागपूर. (Nagpur)गावाची रचना बदलावी, गावाचा विकास होऊन देशात समता नांदावी म्हणून (Rashtrasant Tukdoji Maharaj)राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामजयंतीचा संदेश दिला. ग्रामगीतेत महाराजांनी जीवनातील सर्व बाबींवर प्रकाश टाकला आहे. त्यामुळे राष्ट्रसंत हे एक चालते बोलते विद्यापीठच होते. राष्ट्रसंतांनी वर्णिल्याप्रमाणे शिक्षण, संस्कार व सेवा हेच मानवी मूल्यांचा पाया असून त्यांच्या आधारे बलशाली राष्ट्र घडविणे शक्य असल्याचे प्रतिपादन ग्रामगीताचार्य राधेश्याम निमजे यांनी आज येथे केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती ग्रामजयंती म्हणून रविवारी साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात ग्रामजयंती निमित्ताने आयोजित व्याख्यानमालेत निमजे बोलत होते. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी अध्यक्षस्थानी होते. या प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे व्यासपीठावर उपस्थित होते.

राधेश्याम निमजे यांनी राष्ट्रसंत युगप्रवर्तक असल्याचे सांगितले. अनुयायांनी राष्ट्रसंतांकडे त्यांचा जन्मदिवस साजरा करण्याचा हट्ट धरला होता. मात्र, महाराजांना स्वतःचा जन्मदिवस साजरा करायचा नव्हता. या निमित्ताने काहीतरी रचनात्मक कार्य होऊन ग्राम उन्नतीचा मार्ग अवलंबावा म्हणून ग्रामजयंती साजरी करण्याच्या सूचना महाराजांनी त्यांच्या अनुयायांना दिल्या होत्या. त्यानुसार महाराजांचा जन्म झालेल्या यावली येथे सर्वप्रथम कार्यक्रम साजरा होतो. त्यानंतर सर्वत्र ग्रामजयंती साजरी केली जाते असे निमजे यांनी सांगितले.

शिक्षण, संस्कार व सेवेचे महत्त्व त्यांनी अनेक उदाहरणांद्वारे विषद केले. शाळा-महाविद्यालयीन शिक्षणासोबत जीवन शिक्षण महत्त्वपूर्ण आहे. शिक्षणामुळे ज्ञान मिळते त्यामुळे चांगले जीवन जगण्याची कला साध्य करता येते. चांगला नागरिक घडविण्यासाठी जीवन शिक्षण आणि शिक्षणाची सांगड घालण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सोबतच जीवनात संस्काराचे महत्त्व अधोरेखित केले. राष्ट्रसंतांनी सांगितलेल्या मनुष्यत्व, साधूत्व व देवत्व या तीन उत्क्रांतीच्या टप्प्यांचे विवेचन ग्रामगीताचार्य निमजे यांनी त्यांच्या व्याख्यानात केले. प्रपंचासाठी नोकरी गरजेची असते मात्र उपलब्ध संधीतून परमार्थ केला पाहिजे. मनुष्यत्व निर्माण करून सेवाव्रती बना असा संदेश त्यांनी दिला.

कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी शिक्षण म्हणजे अज्ञानाचा पडदा दूर करण्याचा प्रयत्न आणि बुद्धीचा विकास करण्याची वाटचाल असल्याचे सांगितले. विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव दिल्यानंतर ग्रामगीतेतील संकल्पनेनुसार जीवन शिक्षण अभियान सुरू केले आहे. मागील दोन वर्षांपासून या अभियानाला गती मिळाल्याचे कुलगुरू म्हणाले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांमध्ये देखील अशाच प्रकारच्या जीवन शिक्षणाचा समावेश असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी तर संचालन डॉ. विजयालक्ष्मी थोटे यांनी केले. कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी आभार मानले.