देशात धाडसी निर्णय घेणारे सरकार-राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

0

नवी दिल्लीः संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली असून आपल्या भाषणात मुर्मू यांनी देशात धाडसी निर्णय घेणारे सरकार असल्याचा उल्लेख आपल्या भाषणात केला. हा उल्लेख करताना त्यांनी सलग दोन वेळा स्थिर सरकार निवडल्याबद्धल जनतेचे आभार मानले. केंद्र सरकारने राष्ट्रहिताला सर्वोच्च स्थान दिले असून सर्जिकल स्ट्राईकपासून ते दहशतवादावर कारवाई करण्यापर्यंत, नियंत्रण रेषेपासून एलएसीपर्यंत वाईट गोष्टींचा नायनाट करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. कलम 370 ते तिहेरी तलाकपर्यंत निर्णायक निर्णय घेणारे धाडसी सरकार ही सरकारची ओळख बनली असल्याचे त्यांनी संसदेच्या या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना सांगितले.
देशाने आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करून अमृतकाळात प्रवेश केला आहे. आगामी25 वर्षांचा काळ हा स्वातंत्र्याचे सुवर्ण शतक आणि विकसित भारत घडवण्याचा काळ आहे. आपल्यासमोर एक युग निर्माण करण्याची संधी आहे. यासाठी 100% कार्यक्षमतेने काम करावे लागेल. आपल्याला 2047 पर्यंत असे राष्ट्र घडवायचे आहे, ज्यात भूतकाळाचे वैभव आणि आधुनिकतेचा प्रत्येक सुवर्ण अध्याय आहे. आपल्याला स्वावलंबी भारत बनवायचा आहे. या भारतात गरीबी राहणार नाही तर मध्यमवर्ग श्रीमंत राहील तसेच या देशातील तरुण काळाच्या दोन पावले पुढे असतील, असे राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या.
भारतात एक स्थिर, निर्भय आणि निर्णायक सरकार आहे, जे मोठ्या स्वप्नांसाठी काम करते आहे. देशात प्रामाणिक लोकांचा आदर करणारे, नावीन्यपूर्ण आणि तंत्रज्ञानाद्वारे सार्वजनिक कल्याणाला प्रधान्य देणारे, महिलांपुढे अडथळे दूर करणारे सरकार आहे, असा उल्लेखही त्यांनी केलाय.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा