चंद्रपुरातुन जेरबंद वाघाचा नागपुरात मृत्यू

0

5 जानेवारीपासून होता गोरेवाडा केंद्रात


नागपूर. सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाड उपवनक्षेत्रातील सामदा भागात (Samada area of the Vyahad sub-forest zone in the Savali forest zone ) धुमाकूळ घालत शेतकऱ्याच्या नरडीचा घोट घेणाऱ्या वाघाला 4 जानेवारीला जेरबंद करण्यात आले होते. दुसऱ्याच दिवशी पुढील देखभालीसाठी गोरेवाडा येथील वन्यप्राणी बचाव केंद्रातील (Gorewada Wildlife Rescue Centre ) वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रात आणण्यात आले होते. गोरेवाडा येथील वन्यप्राणी चिकीत्सालयातील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या देखरेखीत ठेवण्यात आले होते. उपचारादरम्यान शुक्रवारी सायंकाळी अचानक त्याची प्रकृती खालवली. तातडीने त्याच्यावर उपचार करण्यात आले मात्र त्याचा मृत्यू झाला (tiger died). त्यात्या मृत्युचे नेमके कारण अस्पष्ट असून शवविच्छेदन अहवालातूनच नेमके कारण स्पष्ट होऊ शकणार आहे. नियमानुसार गोरेवाडा वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र परिसरातील दहनगृहात दहन करण्यात आले.


सुमारे 3 वर्षांच्या या नर वाघाने काही दिवसांपासून परिसरात दहशत माजवली होती. कैलास खेडेकर या शेतकऱ्याचा बळीसुद्धा घेतला होता. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने बेशुद्ध करीत व्याहाड बुज कॅनल परिसरातून त्याला जेरबंद केले होते. गोरेवाडा केंद्रात वन्यप्राणी चिकीत्सालयातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीत ठेवण्यात आले होते. तो नियमितपणे अन्नसुद्धा खात होता. परंतु, शुक्रवारी अचानक आजारी पडला. त्यामुळे वन्यप्राणी चिकीत्सालयातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. सायंकाळी 6.15 वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला.
गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रा अंतर्गत असलेल्या वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील वन्यप्राणी चिकीत्सालयात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार शवविच्छेदन पूर्ण करण्यात आले. यावेळी केंद्राचे उपसंचालक डॉ. व्ही. एम. धूत, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयातील रोगनिदान शास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. पी. एम. सोनकुसरे, विषयतज्ज्ञ डॉ. मयूर पावशे, डॉ. शालिनी ए. एस., पशुधन विकास अधिकारी डॉ. किशोर भदाने, डॉ. भाग्यश्री भदाने उपस्थित होते.
संचालक डॉ. बहार बाविस्कर, मुख्य वन्यजीव रक्षक व प्रधान मुख्य वनसंरक्षक उधम सिंग यादव, यांच्या समक्ष शवविच्छेदनाची संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात आली.
शवविच्छेदनानंतर वाघावर परिसरातील दहनगृहात दहन करण्यात आले. यावेळी गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक शतानिक भागवत, सहाय्यक वनरक्षक एच. व्ही. माडभुषी, वनपरिक्षेत्र अधिकारी निलय. एस. भोगे आदी उपस्थित होते.