मुंबई : पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत गोंधळाची स्थिती आहे. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नाराज असून त्यांनी आपली नाराजी आता जाहीरपणे बोलून दाखविली (Sanjay Raut on MVA unity) आहे. विधानपरीषद निवडणुकीमध्ये जो गोंधळ झाला, तो झालेला असून तो नाकारता येणार नाही, असे नमूद करून संजय राऊत म्हणाले की, त्याकडे महाविकास आघाडी म्हणून लक्ष द्यायला पाहीजे. या पाच जागांच्या निवडणुकासंदर्भात एकत्र बसून भूमिका ठरवणे आवश्यकत होते. मात्र, तसे झाले नाही. नागपूर, अमरावती या दोन्ही जागेसंदर्भात काळजीपूर्वक निर्णय घेणे गरजेचे होते. अमरावतीत काँग्रेसचा उमेदवार नव्हता त्यांनी आमचा उमेदवार घेतला. आम्ही सुद्धा लढलो असतो. नाशिकचा जो घोळ झाला त्यासंदर्भात कुणालाच दोष देता येणार नाही, असे खासदार राऊत म्हणाले.
खासदार राऊत म्हणाले की, सामान्य किमान कार्यक्रमावर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले होते. तीन वेगवेगळ्या पक्षाचे लोक एकत्र आले आणि सरकार स्थापन करण्यात आले होते. त्यामुळे महाविकास आघाडीत समन्वय होता. ज्या पद्धीतीने सरकार चालविण्यात आले, तोच समन्वय आणि एकोपा विरोधी पक्षात काम करताना सुद्धा असायला हवा, तरच आपण पुढील सर्व लढाया एकत्रपणे लढू शकतो, असे मतही राऊत यांनी व्यक्त केले.
नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली असून अधिकृत उमेदवार सुधीर तांबे यांच्याऐवजी त्यांचे सुपूत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने काँग्रेसची गोची झाली आहे. तर नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ शिवसेनेच्या उमेदवारास सोडण्यास काँग्रेस नेत्यांचा विरोध असून आमदार कपिल पाटील यांच्या शिक्षक भारतीसह विदर्भ शिक्षक संघाने देखील उमेदवार उभा केल्याने शिवसेनेचा उमेदवार संकटात सापडला आहे.