
नवी मुंबई : पुरस्कारप्राप्त कलावंतांना यापुढे सरसकट अ वर्गाचे निवृत्तीवेतन देणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केली.
वाशी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडा संकुलात आयोजित तमाशा महोत्सवात तमाशाम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ना.श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी आमदार श्रीमती मंदा म्हात्रे, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री. विकास खारगे, सांस्कृतिक कार्य संचालक श्री. विभीषण चवरे, अभिनेत्री श्रीमती प्रिया बेर्डे, अभिनेता श्री. संदीप पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलतांना ना. सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की कलावंत जेव्हा आपल्या समस्या घेऊन सांस्कृतिक विभागाकडे येतील तेव्हा सांस्कृतिक विभाग कलावंतांच्या पाठीशी सदैव ठामपणे उभा राहील. ते म्हणाले की, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये चेहऱ्यावर आनंद देण्याची शक्ती आहे. जगातील महागडे सौंदर्य प्रसाधन म्हणजे चेहऱ्यावरील हास्य व आनंद आहे, ते देण्याची ताकद कलावंतांमध्ये आहे. ही शक्ती आणि उर्जा कायम त्यांच्याकडे रहावी.
यावेळी सन २०१८-१९ चा तमाशाम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार कै. गुलाबबाई संगमनेरकर यांना जाहीर करण्यात आला होता. हा पुरस्कार त्यांच्या कन्या अल्का संगमनेरकर व कल्पना संगमनेरकर यांनी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते स्वीकारला. तर सन २०१९-२० चा पुरस्कार श्री. अतांबर शिरढोणकर यांना आणि सन २०२०-२१ चा पुरस्कार श्रीमती संध्या रमेश माने यांना यावेळी प्रदान करण्यात आला.
चौकट
यावेळी वरूणराजाने अचानक हजेरी लावली, तरीही उघड्या मैदानात असलेला हा कार्यक्रम तेथेच पार पडला. यावेळी बोलतांना तमाशा कलावंतांच्या वतीने श्री अतांबर शिरढोणकर यांनी त्यांच्या भावना मांडल्या. बऱ्याच वर्षांनंतर सांस्कृतिक विभागाला ना.श्री. सुधीरभाऊंसारखा धडाडीचा मंत्री लाभला आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.