मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी गौप्यस्फोट केला. हे प्रकरण साधे नसून त्याची सुरुवात महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात झाली व मविआचे अनेक नेते तसेच मुंबईच्या एका माजी पोलिस आयुक्तांचे नाव या प्रकरणात आले असल्याचा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला आहे. आम्ही आरोपींना फोनद्वारे व्यस्त ठेवत होतो. त्यामुळे अनेक बाबी रेकॉर्डवर आल्या आहेत. यामध्ये अनेक नेत्यांची आणि अधिकाऱ्यांची नावे समोर आली आहेत, असेही त्यांनी सांगितले.
फडणवीस यांनी सांगितले की, कदाचित महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये गेल्या सात-आठ वर्षांपासून फरार असलेल्या अनिल जयसिंघानी या व्यक्तीविरोधातील केस मागे घेण्याच्या कटाची सुरुवात झाली होती. पण सरकार बदलले व त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल करुन आपण आपल्यावरील केसेस मागे घेऊ शकतो. या प्रकरणात जो एफआयआर झाला त्यात यासर्व गोष्टी रेकॉर्डवर आणल्या गेल्या. पण, फरार व्यक्तीला पकडायचे असल्याने आम्ही एफआयआर यासाठी जाहीर केला नव्हता, असे ते म्हणाले.
एफआयआर झाल्या कारणाने दोन दिवसांत तो न्यायालयात सादर करावा लागतो. त्यामुळे तिथून त्याची एक बातमी आली. त्यानंतर त्यावर कारवाई तर झाली पण अद्याप हा व्यक्ती सापडलेला नाही. कदाचित यामुळे तो सावध झाला असेल पण पोलिस त्याचा शोध घेत आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. फडणवीस म्हणाले, राजकारण हे सर्वात नीच पातळीवर पोहोचले आहे. मी कोणावर आता थेट आरोप करणार नाही. कारण या व्यक्तीने अशा लोकांची नावे घेतली आहेत की त्यात किती तथ्य आहे, हे तपासानंतरच समोर येईल. पण त्याने मुंबईच्या एका माजी पोलीस आयुक्ताचे नाव घेतले आहे. पण, मी जेव्हा पोलिसांकडून माहिती घेतली, तेव्हा मला कळले की, मविआ सरकारच्या काळातच त्याच्यावरील प्रकरणे मागे घेण्याची कार्यवाही सुरु झाली होती. त्यावर काही नोटिंगही झाले आहे. याचे जसे पुरावे मिळतील, तेव्हा ते माध्यमांसमोर आणले जातील तसेच आरोपपत्रातूनही उर्वरित बाबी समोर येतील, असे फडणवीस यांनी सांगितले.
कोण आहे जयसिंघानी
फडणवीस यांनी सांगितले की, या प्रकरणातील आरोपी अनिल जयसिंघानी गेल्या सात ते आठ वर्षांपासून फरार होता. त्याच्यावर 14-15 गुन्हे दाखल आहेत. त्याला एक मुलगी आहे, जी हुशार आणि सुशिक्षित आहे. ती 2015-2016 मध्ये अमृताच्या संपर्कात आली. पण त्यानंतर तिने सर्व संपर्क बंद केला. पण 2021 मध्ये तिने पुन्हा माझ्या पत्नीशी संपर्क साधला, असे फडणवीस यांनी सांगितले. अनिल जयसिंघानी याला सट्टेबाजीच्या प्रकरणात तीनदा अटक करण्यात आली होती आणि पाच राज्यांतील सात प्रकरणांमध्ये तो हवा आहे. मे 2015 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) गुजरात युनिटने जयसिंघानी यांच्या दोन घरांवर छापे टाकले आणि मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. पण खराब प्रकृतीचे कारण देत तो फरार राहिला आणि आठ महिन्यांनंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयात ट्रान्झिट जामिनासाठी अर्ज केला. मुंबईतील आझाद मैदान आणि साकीनाका या दोन पोलिस ठाण्यांमध्ये 2016 मध्ये त्याच्याविरुद्ध फसवणूक आणि बनावटगिरीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते, असे फडणवीस यांनी सांगितले.