मुंबईः कार्डिलिया क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणात एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे (Former NCP Director Sameer Wankhede) यांनी आर्यन खानला या प्रकरणात न अडकविण्यासाठी लाच मागितली होती, अशी माहिती उघडकीस आल्यावर आता त्यांचे आणखी काही तपशील पुढे आले (Aryan Khan Case) आहे. वानखेडे यांच्या वतीने पंच किरण गोसावीनेच संबंधितांशी सौदा केला होता.
त्यात सुरुवातीला २५ कोटी रुपयांची मागणी केल्यावर १८ कोटी रुपयांमध्ये सौदा पक्का झाला होता, अशी माहिती उघडकीस आली आहे. सीबीआयने या प्रकरणात एफआयआर नोंदविला आहे.
वानखेडे यांच्यावर दाखल एफआयआरनुसार, समीर वानखेडे यांनी गोसावी यांना सौद्याच्या पैशाच्या प्रकरणात संपूर्ण सूट दिली होती. गोसावी यांनी 18 कोटींचा सौदा पक्का केला होता. एवढेच नाही तर गोसावी यांनी 50 लाख रुपये अॅडव्हान्सही घेतले होते. आर्यन खान एनसीबीच्या आणि खास करून आरोपी आणि पंच असलेल्या किरण गोसावीच्या ताब्यात आहे, हे दाखवण्यासाठीच आर्यनचा ताबा पंच गोसावीला देण्यात आला होता. वानखेडे यांच्या आदेशानुसारच गोसावी आर्यनला घेऊन एनसीबी कार्यालयात आला होता, असे नमूद आहे.
वानखेडेंना समन्स
दरम्यान, समीर वानखेडे यांना सीबीआयने समन्स जारी केले आहे. आपला जबाब नोंदवण्यासाठी त्यांना १८ मे रोजी नवी दिल्लीतील सीबीआय कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
समीर वानखेडेने यांनी आपल्या परदेशप्रवासाबाबत योग्य माहिती दिली नव्हती. त्यांनी त्यांच्या महागड्या घड्याळ आणि कपड्यांबद्दल सत्य देखील सांगितले नाही. समीर वानखेडे यांच्या बेहिशोबी मालमत्तेचाही एफआयआरमध्ये उल्लेख आहे.