अपात्रतेच्या मुद्यावर नियमानुसारच निर्णय घेऊ-नार्वेकर

0

मुंबईः सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अपात्रेच्या मुद्यावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Speaker of Legislative Assembly) काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागलेले असतानाच नार्वेकर यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आपण नियम आणि तरतुदींच्या आधारावर निर्णय घेऊ, असे त्यांनीी सांगितले. मागण्या सगळ्यांच्या येत आहेत. मात्र, कायद्याच्या आधारेच निर्णय घेण्यात येईल. जो निर्णय होईल, तो कायद्याच्या चौकटीतच होईल. विधानसभा उपाध्यक्षांचे अधिकार त्यांना माहित आहे. अध्यक्षांची नियुक्ती नसताना उपाध्यक्षांकडे त्यांचे अधिकार असतात. मात्र अध्यक्ष असताना त्यांच्याकडे कोणतेही अधिकार नसतात, असे नार्वेकर यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने आमदारांना अपात्र ठरविण्याचे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवले आहे. राहुल नार्वेकर हे लंडनच्या दौऱ्यावर होते. आजच ते लंडनवरुन मुंबईत दाखल झाले. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना नार्वेकर यांनी सांगितले की, कायद्यात जी तरतूद आहे, त्यानुसारच निर्णय घेतला जाईल. प्रक्रिया 15 दिवसात पूर्ण झाली तर 15 दिवसात निर्णय घेऊ. कोणाच्या इच्छेनुसार निर्णय होणार नाही. अध्यक्षांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला तर आपल्याकडे अनेक मार्ग आहेत. मी जो निर्णय घेईल तो घटनेनुसारच असेल, असे नार्वेकर यांनी सांगितले.