टीम इंडियापुढे ‘डब्ल्यूटीसी’ विजेतेपदासाठी 280 धावांचे अवघड आव्हान

0

 

ओव्हल : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचा आज अखेरचा दिवस असून जेतेपदाच्या या लढतीत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 444 धावांचे लक्ष्य दिले असून टीम इंडियाने चौथ्या दिवशी 3 विकेट गमावून 164 धावापर्यंत मजल मारली आहे. सामन्याच्या अखेरच्या दिवशी टीम इंडिया लक्ष्यापर्यंत मजल मारणार की पराभवाचा सामना करावा लागणार, हे आज सायंकाळपर्यंत स्पष्ट झालेले असेल. (WTC 2023-India vs Australia) आज कसोटीचा विश्वविजेता घोषित होणार आहे, हे विशेष.
टीम इंडियाला विजयासाठी अद्याप 280 धावांची गरज आहे. काल नाबाद राहिलेले विराट कोहली (44) आणि अजिंक्य रहाणे (20) हे आज खेळण्यासाठी पुन्हा नव्याने मैदानात उतरणार आहेत. तत्पूर्वी, भारताचे रोहित शर्मा (43), शुभमन गिल (18) आणि चेतेश्वर पुजारा (27) हे तीन फलंदाज यापूर्वीच बाद झालेले आहेत. धावपट्टीची स्थिती व एकूणच परिस्थिती लक्षात घेता या लक्ष्याचा पाठलाग करणे टीम इंडियासाठी फारच आव्हानात्मक ठरणार असल्याचे तज्ज्ञांना वाटते. टीम इंडियाने रोहित शर्मा, शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांसारख्या स्टार फलंदाजांच्या विकेट्स गमावल्या असल्या तरीदेखील अजून टीम विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर या फलंदाजांमुळे आशा कायम आहेत. पाचव्या दिवशी टीम इंडियाला आणखी 280 धावा कराव्या लागणार आहेत.

शुभमनच्या ‘बाद’ वरून वाद

सामन्याच्या चौथ्या दिवशी शुभमन गिल हा बाद नसताना त्याला बाद दिले गेल्याचा दावा सुरु झाला आहे. शुभमनचा झेल कॅमेरून ग्रीनने एका हाताने झेल घेतला. मैदानावरील अंपायरने थर्ड अंपायरचे मत घेतले. थर्ड अंपायरने रिप्ले पाहिल्यावर चेंडूचा जमिनीला स्पर्श झाला असल्याचे दिसत आहे. मात्र, थर्ड अंपायरने बाद चा निर्णय दिला.