मुंबईः शिवसेनेचे फायरब्रँड नेते दिवंगत आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत पुन्हा एकदा संशयाचे वातावरण निर्माण करण्यात आले आहे. यासंदर्भात ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु असून आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आनंद दिघेंचा अपघात नव्हे खून झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. या आरोपावर आता धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी शिंदे गटातील नेत्यांना थेट पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले आहे. आनंद दिघे यांचा पुतण्या या नात्याने मी त्यामागे ठामपणे उभा राहीन, असेही ते म्हणाले.
केदार दिघे म्हणाले की, दिघे साहेबांच्या पश्चात गेल्या २२ वर्षांत त्यांच्या मृत्यूचा विषय कधी कोणी काढला नाही. कधीही कोणी याबाबतीत बोलले नाही. अचानक निवडणुका येतात किंवा स्वतःचं अस्तित्व दाखविण्यासाठी दिघे साहेबांचा विषय काढला जातो. आमदार शिरसाट यांच्याकडे काही पुरावे असतील त्यांनी सादर करावे. गुरुवर्य आनंद दिघे यांना मी अग्नी दिला आहे. मी त्यांचा पुतण्या आहे. त्यामुळे माझे हे कर्तव्य आहे की दिघेसाहेबांच्या बाबतीत कोणतीही चुकीची घटना घडली असेल तर त्यासाठी मी ठामपणे आणि खंबीरपणे उभा राहायला तयार आहे. परंतु, बोलायचं म्हणून बोलायचं आणि दिघे साहेबांच्या नावाने स्वतःला टीआरपी मिळवून घ्यायचा, हा केविलवाणा प्रकार त्यांच्याकडून दिसतो आहे, असेही ते म्हणाले.