लुधियाना-दूरदर्शनवरील गाजलेले पंजाबी अभिनेते मंगल ढिल्लन यांचे लुधियाना येथील कर्करोग रुग्णालयात निधन झाले. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. एक महिन्यापासून त्यांच्यावर रुग्णालयात कर्करोगावर उपचार सुरु होते. ढिल्लन यांनी अभिनेत्यासोबत लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक म्हणूनही आपली कारकीर्द घडविली होती. ढिल्लन यांनी छोट्या खेड्यातील अनेक तरुणांना फिल्मी दुनियेत आणले. 1988 मध्ये ‘अदालत’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता.
मंगल ढिल्लन यांची अभिनेता म्हणून १९८६ मधील कथा सागर ही पहिली मालिका होती. बुनियाद या प्रसिद्ध मालिकेने ते अभिनेता म्हणून नावारुपास आले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी किस्मत, द ग्रेट मराठा, मुजरिम हाजीर, रिश्ता मौलाना आझाद, नूरजहान यांसारख्या मालिकांमध्ये काम केले.