WRDH वर्धा, 07 जून : वर्धा शहरातील MIDC एमआयडीसी परिसरात भंगार गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत कोट्यवधीं रुपयांच्या साहित्यांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आलीय. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 3 गाडा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. गोदामात प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या, लाकूड फाट्यांचा मोठा साठा असल्याने आगीने उग्र रुप धारण केले आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झाल्याची माहिती पुढे आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा शहरातील एमआयडीसी परिसरातील एका भंगाराच्या गोदामात सकाळी 9.45 सुमारास आग लागली. आग कशामुळे लागली, याचं कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतु गोदामातून उंच धुराचे लोट निघाल्याचं दिसून आल्यानंतर स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहे. याशिवाय पुलगाव येथील सैन्य दलाच्या ताफ्यातून अग्निशमन दलाच्या तीन गाड्या बोलवण्यात आल्या आहे. त्यानंतर आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती आहे. वाढलेली उष्णता आणि गोदामात लाकडाचा साठा जास्त असल्याने आगीने मोठ्या प्रमाणात पेट घेतला आहे.
वर्धा एमआयडीसीतील गोदामात काही दिवसांपूर्वीच साहित्यांचा साठा ठेवण्यात आला होता. प्लास्टिकच्या बाटल्या आणि लाकडी फाटे गोदामात ठेवण्यात आल्याने आगीने उग्र रुप धारण केलं आहे. स्थानिकांनी पाण्याचे टँकर घटनास्थळी आणले असून आग विझवण्यासाठी पाण्याचे फवारे मारण्यात येत आहे. त्याचबरोबर अग्निशमन दलाचे जवान गोदामात दाखल झाले असून आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.