खा. कृपाल तुमाने यांनी स्वीकारावे अजितदादांचे आव्हान-अनिल देशमुख

0

नागपूर – रामटेकचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी अजित पवार यांच्याबाबत जे वक्तव्य केले ते चुकीचे आहे. आता त्यांनी अजित पवार यांचे आव्हान स्वीकारावे असे माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. राज्यात जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. विदर्भातील अकोल्यापासून सुरू झालेले दंगलीचे लोण आता थेट कोल्हापूरपर्यंत पोहोचले असून सरकारलाच दंगली घडवायच्या आहेत की काय असे वाटते या शब्दांत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर आज माध्यमांशी बोलताना हल्लाबोल केला. देशमुख म्हणाले, समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असे प्रयत्न सतत सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहेत. निवडणुकीपूर्वी दंगली घडवून आणायच्या, लोकांच्या भावना भडकवायच्या आणि त्याचा फायदा घ्यायचा, असा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. सत्ताधाऱ्यांच्या या डावाला बळी पडू नये, असे आवाहन देखील त्यांनी केले. दरम्यान,नागपूर शहराध्यक्ष दुनेश्‍वर पेठे यांनी केलेल्या विभागीय अध्यक्ष नियुक्त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी विरोध केला आहे. या नियुक्त्यांवर फेरविचाराची मागणी केली आहे. याबाबत विचारले असता, पक्षात कुठलेही मतभेद नाहीत. नियुक्त्यांवरून वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात. चर्चेतून तोडगा काढता येईल, असे देशमुख म्हणाले.