“राष्ट्रवादीचा एक गट भाजपच्या उंबरठ्यावर..” ठाकरे गटाचा दावा

0

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा (Sharad Pawar) राजीनामा दिल्याच्या कारणावरून राज्याच्या राजकारणात वादळ आले असताना आता ठाकरे गटाने महत्वाचा दावा केला आहे. सामनाच्या अग्रलेखातून हा दावा करण्यात (BJP and NCP Politics) आलाय. “राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट भारतीय जनता पक्षाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला आहे व राज्याच्या राजकारणात कधीही कोणता भूकंप होऊ शकतो असे वातावरण असताना पवारांनी राजीनामा देऊन धरणीकंप घडवला. पक्षातील ‘ईडी’सारख्या तपास यंत्रणांमुळे निर्माण झालेली अस्वस्थता व त्या अस्वस्थतेतून सहकाऱ्यांनी निवडलेला भाजपचा मार्ग हे कारण राजीनाम्यात आहे काय?” असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनात पुढे म्हटले आहे की, विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि त्यांचा गट वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असताना त्यांना अडविण्यासाठी पवारांनी अध्यक्षपद सोडण्याचे पाऊल उचलले आहे काय? शिवसेना फुटली असली तरी आणि चाळीस आमदार सोडून गेले असले तरी पक्ष व संघटन जागेवरच आहे. उद्या राष्ट्रवादीच्या बाबतीत असे झाल्यास जिल्हास्तरावरील फळी आपल्याच मागे रहावी, या दृष्टीने जनमानसाची चाचपणी करण्याचा हा प्रयोग असू शकतो, असे मतही अग्रलेखात व्यक्त करण्यात आले. राज्यातील अनेक नेते आज कुंपणावर आहेत व त्यातील अनेक नावे पवारांच्या पक्षातली आहेत. याच कुंपणावरच्या काही नेत्यांनी पवारांच्या राजीनाम्यानंतर सगळ्यात जास्त विलाप केला. शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सगळ्यांना उघडे केले. आज जे पायाशी पडले तेच उद्या पाय खेचणार असतील तर त्यांचे मुखवटे ओरबाडून काढले, असा दावाही करण्यात आलाय.

अजित पवारांचे ध्येय
अजित पवारांचे राजकारणातील अंतिम ध्येय हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणे हे आहे. तर सुप्रिया सुळे यांचा दिल्लीतला वावर चांगला आहे. असे म्हणत पक्षाचे अध्यक्षपद निवडताना काळजी घ्यावी लागेल, असा सल्लाही त्यात देण्यात आलाय.