अजित पवारांना अध्यक्षपद देऊ नये-शालिनीताई पाटील

0

 

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे घोटाळेबाज आहेत आणि वेगवेगळ्या गुन्ह्यांत अडकलेले नेते आहेत. त्यांना कधीही अटक होऊ शकते. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद देणे चुकीचे ठरेल, असे वक्तव्यमाजी मंत्री शालिनीताई पाटील (Shalinitai Patil) यांनी केले आहे. शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर एकच गोंधळ उडाला असताना अजित पवार की सुप्रिया सुळे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर अजित पवार हे घोटाळेबाज असल्याने ते राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी सक्षम नाहीत, असे शालिनीताई पाटील म्हणाल्या आहेत. शरद पवार यांच्या कट्टर राजकीय विराेधक म्हणून माजी मंत्री शालिनीताई पाटील या ओळखल्या जातात.
घाईचा निर्णय
शालिनीताई पाटील यांनी एका वाहिनीशी बोलताना पवारांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर भाष्य केले. शरद पवार यांनी आपला निर्णय घाईने घेतला आहे. योग्य पर्याय समोर येत नाही,तोवर पवारांनी निवृत्ती घेऊ नये, असे त्यांच्या आमदारांना वाटते. मी आज 90 वर्षांची आहे. तरी लोक मला निवृत्ती घेऊ देत नाही. शरद पवार तर माझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहेत, असा उल्लेख करून शालिनीताई पाटील पवारांना सल्ला दिला.

अजित पवारांवर आरोप

अजित पवार यांना अध्यक्षपद देण्यात येऊ नये, असे मत व्यक्त करून शालिनीताई म्हणाल्या की, जरंडेश्वर कारखान्यात अजित पवार यांनी 1400 कोटींचे मनी लॉड्रिंग केले आहे. ईडीने त्याची चौकशी केली मात्र अजूनपर्यंत अजित पवारांना का बोलावले नाही? कारण अजित पवारांवर भाजपच्या मोठ्या नेत्याचा हात आहे. त्यामुळे अद्याप त्यांची चौकशी झालेली नाही. त्यामुळे अध्यक्षपद हे सुप्रिया सुळेंनाच द्यायला हवे, असा सल्लाही त्यांनी दिलाय.