मुंबईः काँग्रेसच्या सांगण्यावर आमची मते कमी करण्यासाठी व काँग्रेसची दलाली करण्यासाठी खासदार संजय राऊत याठिकाणी आले आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी बेळगाव येथे बोलताना केली आहे. राऊतांनी काँग्रेसची दलाली सोडली तर मी येथे येणार नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. यापूर्वी खासदार संजय राऊतही बेळगाव दौऱ्यावर होते. काँग्रेसच्या सांगण्यावरूनच संजय राऊत हे भाजपविरोधात प्रचारासाठी बेळगावला आले होते, असे फडणवीस म्हणाले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे रोजी मतदान पार पडणार आहे असून मराठी मतांसाठी काँग्रेस, भाजप असा जोरदार संघर्ष सुरु आहे. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांसाठी रोड शो केला.
या पार्श्वभूमीवर बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना संपूर्ण कर्नाटकात फिरत होते. मराठी भाषकांच्या पाठिमागे मी आणि भाजप आहे. राऊतांनी काँग्रेसची दलाली सोडली तर मी येथे येणार नाही. ते काँग्रेसची दलाली करण्यासाठी येथे येत आहेत. आम्हाला सांगण्यापेक्षा काँग्रेस संजय राऊतांचा मित्रपक्ष आहे. त्यांनी याठिकाणी उमेदवार उभे करू नये याबाबत त्यांनी काँग्रेसला सांगायला हवे होते. मात्र काँग्रेसच्या सांगण्यावर आमची मते कमी करण्यासाठी, काँग्रेसची दलाली करण्यासाठी संजय राऊत याठिकाणी आले, असा आरोपही फडणवीस यांनी केला.