लक्ष्मीपूजनाच्या निमित्त ‘पहाट वारा’ या संगीतमय कार्यक्रमात संगीतप्रेमींना जुन्या आठवणींची सफर घडवली. खासदार महोत्सव समिती, कलासंगम आणि केशवनगर सांस्कृतिक सभेने रेशीमबाग बगिचा येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला विनस स्पोर्ट्स असोसिएशन आणि जगदंबा माता मंदिर देवस्थान, रेशीमबाग यांचे सक्रिय सहकार्य लाभले.
नागपूर शहरातील प्रसिद्ध गायक विनोद वखरे, यशश्री भावे पाठक या प्रमुख गायक कलावंतांच्या उपस्थित हा कार्यक्रम प्रस्तुत करण्यात आला. प्रणय कुठे यांनी ‘सूर निरागस हो’ या ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील गणपती वन्दनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. नंतर ‘भीनी भीनी भोर’ हे गुलजार रचित आणि आशा भोसले यांनी स्वरसाज चढविलेल्या गीताला आयुषी देशमुख यांनी गाऊन कार्यक्रमाची रंगत वाढविली. दीपावली मनाये सुहानी, मी मज हरपून बसले गं, पाहीले न मी तुला अशी मराठी अवीट गॊडीची गाणी सादर करण्यात आली. स्वरदा देशपांडे, निलेश सावरकर ह्या तरुण गायक कलावंतांनी देखील आपल्या गोड आवाजाने प्रेक्षकांची माने जिंकली. गाजलेली हिंदी चित्रपट गीते गोंधळ, लावणी हे प्रकार तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. विशेष करून ‘दमा दम मस्त कलंदर’ या यशश्री भावे पाठक यांच्या गाण्याला तसेच विनोद वखरे यांनी गायलेल्या ‘गीत रामायण’ च्या मेडलीला रसिकांनी भरभरून दाद दिली. सिंथेसियझरवर श्रीकांत पिसे, ऑक्टोपॅडवर विशाल दहासहस्त्र, संवादिनीवर निलेश सावरकर तसेच तबल्यावर प्रमोद बावने या वादक कलावंतांनी सुयोग्य साथसंगत केली.
या कार्यक्रमास दक्षिण नागपूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार मोहन मते विशेषत्वाने उपस्थित होते. दरम्यान कलासंगम आणि केशवनगर सांस्कृतिक सभेतर्फे समाजसेवेचा भाग म्हणून शंकर नगर येथील मुकबधिर विद्यालयास ११०००/- ची देणगी त्यांच्या प्राचार्या सौ मिनलताई सांगोळे यांना प्रदान करण्यात आली. ‘सक्षम’ संस्थेचे डॉ. मिलिंद हरदास यांचा त्यांच्या समाजकार्याची पावती म्हणून या निमित्ताने सत्कार करण्यात आला. ‘लोक जागर मंच’ चे रेशीमबाग क्षेत्राचे प्रमुख श्री संदीप वाघ यांनी कार्यक्रमाला उपस्थित प्रेक्षकांसमोर निवेदन केले की येत्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीला १०० टक्के मतदान करण्याचे आवाहन केले.