खारघर घटनेच्या चौकशीसाठी एक सदस्य समिती

0

मुंबई (Mumbai ) : खारघर (Kharghar)येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे १४ जणांचा मृत्यू झाल्याच्या दुदैवी घटनेची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी एकसदस्य समिती नेमली (Enquiry Committee for Kharghar Incidence) आहे. ही समिती एक महिन्याच्या कालावधीत अहवाल सादर करणार असल्याचे सांगण्यात आले. आजच विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी खारघर घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी मागणी राज्यपालांना पत्र पाठवून केली आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर शासकीय यंत्रणा राबविण्यात आली. मात्र, त्याचा खर्च दाखविण्यात आला नाही, याची ही चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अजित पवार (Ajit Pawar)यांनी केली होती.

खारघर घटनेची चौकशी करण्याची विरोधी पक्षाकडून सातत्याने मागणी होत असताना राज्य सरकारने आता समिती नेमण्याची घोषणा केली आहे. ही समिती एका महिन्याच्या मुदतीत याबाबतचा अहवाल सादर करेल. भविष्यातील अशा प्रकारच्या समारंभाच्या आयोजनाच्या बाबतीत कोणत्या गोष्टींची काळजी, दक्षता घ्यावी, याबाबतही समिती शासनास शिफारशी करेल. आजच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहिले आहे. खारघरमध्ये महाराष्ट्रभूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या वेळी घडलेल्या दुर्दैवी घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याच्या मागणीसह इतर महत्त्वाच्या मागण्या केल्या होत्या.