वंदे भारत एक्सप्रेसच्या सुरक्षेसाठी सर्चिंग करणाऱ्या पोलिसाचा रेल्वेखाली येऊन मृत्यू

0

गोंदित दुर्दैवी घटना : बॉम्ब शोध व नाशक पथाकात होती नियुक्ती


गोंदिया. वंदे भारत एक्स्प्रेसची (Vande Bharat Express) सुरक्षा म्हणून नक्षलग्रस्त भागात (Naxal affected areas ) सर्चींग करण्यास गेलेल्या बॉम्ब शोध व नाशक पथकातील पोलिस कर्मचाऱ्याचा रेल्वेने कटून मृत्यू (policeman died after being hit by a train) झाला. ही दुर्दैवी घटना १० डिसेंबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. विजय नसीने बक्कल नंबर १२४ असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. नसीने हे गोंदियाच्या बॉम्ब शोध व नाशक पथाकात होते. ११ नोव्हेंबर रोजी वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन झाले. पण, ही गाडी गोंदिया जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त भागातून जाणार असल्यामुळे गोंदियाचे बॉम्ब शोध व नाशक पथक घातपात होऊ नये यासाठी रेल्वेरूळ तपासण्यासाठी गेले होते. शसस्त्र दूरक्षेत्र दरेकसा हद्दीत तपासणी करीत असतांना दरभंगा या गाडीने त्यांना धडक दिली. यात त्यांचा मृत्यू झाला.

नक्षलवाद्यांशी लढा देणाऱ्या तब्बल ९२ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणी व दीडपट वेतनापासून मुकविण्यात आले आहे. यात विजय नसीने यांचाही समावेश आहे.
नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल भागात काम करणाऱ्या पोलिसांना शासन दीडपट वेतन देते. परंतु, तत्कालीन पोलिस अधिक्षक विश्व पानसरे यांनी एप्रील २०२१ पासून आजपर्यंत गोंदिया जिल्ह्यात श्वान पथक, बिडीडीएस पथक, एटीसी, जेटीएससी, व नक्षल सेल अंतर्गत प्रपोगंडा सेल, इंटरसेप्शनसेल, नक्षल ऑपरेशन सेल, इंटर सेल, टेकसेल यांचे दीडपट वेतन बंद केले आहे.
बिडीडीएस पथकात विजय नसीने काम करीत असतांना त्यांना दीडपट वेतन देण्यात आले नाही. जीव धोक्यात टाकून काम करणाऱ्या पोलीसांना दीडपट वेतनापासूनही वंचित ठेवण्यात आले आणि धोक्याच्या ठिकाणी कामावर पाठविणे हे न्याय संगत आहे का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. मागील दीड वर्षापासून या शाखांमध्ये काम करणारे ९२ पोलिस अधिकारी व कर्मचारी दीडपट वेतनापासून वंचित आहेत.