डरकाळी फोडत वाघाने घेतली झेप, पण पंजा अडकला अन्‌ ‘तो’ बचावला

0

नायगाव शिवारातील थरार : नागरिकांची एकच पळापळ


यवतमाळ. शेतात शिरलेल्या वाघाला शोधण्यासह हुसकावून लावण्याचे अतीधाडस शेतमजुराच्या (farm laborer) चांगलेच अंगलट आले होते, वाघाने त्याच्यावर झेपही (tiger jumped on him )घेतली. केवळ सुदैव म्हणून तो थोडक्यात बचावला. अंगावर शहारे आणणारा हा थरार शनिवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास वणी तालुक्यातील नायगाव (Naigaon in Vani Taluka) शेतशिवारात घडला. पंढरी जीवने असे व्याघ्र हल्ल्यातून बचावलेल्या शेतमजुराचे नाव असून, ते नायगाव (बु.) येथील रहिवासी आहे. त्याचे झाले असे की, शेतातील तुरीच्या ओळीत लपून बसलेल्या वाघाला शोधून त्याला हुतकावून लावण्याची जबाबदारी पंढरीने घेतली. तो वाघाच्या टप्प्यात येताच वाघाने डरकाळी फोडत एका बेसावध क्षणी त्याच्यावर झेप घेतली; परंतु त्याचे दैव बलवत्तर म्हणून वाघाचा पंजा शेताच्या कुंपणात अडकला आणि मोठी दुर्घटना टळली.
गेल्या काही दिवसांपासून नायगाव (बु.) परिसरात वाघाचा वावर आहे. शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास नायगाव (बु.) शेतशिवारातील विनोद बोबडे यांच्या शेतात अचानक वाघ शिरला. या वाघाला काहींनी बघितले. पाहता पाहता ही वार्ता वाऱ्यासारखी परिसरात पसरली. नायगाव (बु.) येथील नागरिकांनी वाघ बघण्यासाठी बोबडे यांच्या शेताकडे धाव घेतली. या गर्दीत पंढरी जीवने हादेखील होता. पंढरी मोठ्या हिम्मतीने शेतातील तुरीच्या ओळीकडे सरसावला.
मात्र, शेतात असलेल्या तारेच्या कुंपणापलीकडे तुरीच्या पिकात वाघ बसून होता. याची पुसटशीही कल्पना पंढरीला नव्हती. शेताभोवती जमलेली नागरिकांची संपूर्ण गर्दी वाघ कुठे दिसतो का, याची चाचपणी करीत असताना पंढरी टप्प्यात येताच तुरीजवळ बसून असलेल्या वाघाने पंढरीवर झेप घेतली. मात्र, झेप घेताना वाघाचा पाय कुंपणात अडकला. वाघाने डरकाळी फोडताच एका क्षणात नागरिकांची पळापळ सुरू झाली. पंढरी जीवने यानेदेखील तेथून पळ काढला. दरम्यान, या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आल्यानंतर वणी येथून वनविभागाचे एक पथक घटनास्थळी पोहोचले. या पथकालादेखील तेथे वाघ दिसला. त्यानंतर तेथून हुसकावून लावले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा