भद्रावतीत थरार : आयुध निर्माणी वसाहतीत दहशत
भद्रावती. येथील आयुध निर्माणी वसाहत (Bhadravati Ordnance Factory Colony) परिसरात बिबट्यांचा वावर कायमच दिसतो. शनिवारीच या भागातून एका बिबट्याला जेरबंद करण्यात आले होते. यामुळे नागरिकांनी काहीसा सुटकेचा श्वास टाकला होता. मात्र दोनच दिवसात या भागात सायंकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला (leopard attacked the woman ) चढविला. बिबट्याने महिलेची मान तोंडात पकडली होती. यानंतरही महिलेने धाडसाने प्रतिकार केला. यामुळे बिबट्या झुडपात पळून गेला. पण, या घटनेत महिला गंभीर जखमी झाली (woman was seriously injured ) आहे. आयुध निर्माणी येथील सेक्टर ५ या लोकवस्तीत ही थरारक घटना घडली. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला उपचारार्थ चंद्रपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले आहे.
विमलादेवी टिकाराम (४२) असे जखमी महिलेचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास त्या फिरण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. या भागात मोठ्या प्रमाणावर झुडपे वाढली आहेत. यामुळे वन्यप्रमाण्यांना लपण्यासाठी चांगले अधिवासही तयार झाले आहे. झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक विमलादेवी यांच्यावर झडप घेतली. बिबट्याने त्यांची मान जबड्यात पकडली. त्या पुरत्या घाबरल्या असल्या तरी हिंमत सोडली नाही. सर्व बळ एकवटून त्यानी बिबट्याला प्रतिकार केला. यामुळे बिबट्याला हार पत्करून माघारी फिरावे लागले आणि त्या थोडक्यात बचावल्या. बिबट्याचे दात खोलवर रुतल्याने त्यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी अवस्थेतील विमलादेवी यांच्यावर आयुध निर्माणीच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच क्षेत्र सहायक विकास शिंदे, वनरक्षक धनराज गेडाम यांनी भेट देऊन महिलेला पुढील उपचारार्थ चंद्रपूरला खाजगी रुग्णालयात रवाना केले आहे. वन्य श्वापदाचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
वनविभागाने आयुध निर्माणी प्रशासनाला मानव वस्ती भागातील झुडपांची कटाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, अद्याप या सूचनांचे पालन करण्यात आले नाही. नागरिकांनाही खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे. कुत्र्यांना घेऊन बाहेर फिरू नये, कुत्रे पाळूच नयेत, रस्त्याने पायी, सायकल व दुचाकीने फिरू नये, अशाही सूचना दिल्या आहेत. पण, रहिवाशीसुद्धा या सूचनांचे पालन करीत नसल्याने वनविभागाची चिंता वाढली आहे. वन विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. बिबट्यांना पकडण्यासाठी परिसरात पिंजरे लावण्यात आले आहेत.