आधार-पॅन लिंक करण्याची मुदत वाढली, दंड कायम

0

मुंबई: केंद्र सरकारने पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत आता 31 मार्च वरून 30 जून 2023 पर्यंत वाढविली आहे. सीबीडीटीने यासंदर्भात माहिती जाहीर केली आहे. आधार-पॅन लिंकिंगची अंतिम मुदत यापूर्वी अनेकदा वाढवली गेली आहे. आधार कार्ड हे पॅन कार्डला लिंक करण्याची मुदत जरी वाढवली असली तरी दंड मात्र कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ज्या लोकांनी त्यांचे आधार-पॅन अद्याप लिंक केलेले नाही त्यांना 1000 रुपये भरून ते लिंक करता येणार आहे. आर्थिक कामांसाठी पॅनकार्ड हे अतिशय महत्त्वाचे दस्तऐवज आहे. त्याशिवाय अनेक कामे होऊ शकत (PAN And Aadhar Linking) नाहीत.
आयकर रिटर्न आणि अन्य काही कामांसाठी पॅनकार्ड आवश्यक असते. आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर ई-फायलिंग ही सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये संबंधितांना लिंक आधार पर्याय निवडावा लागणार आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर अगोदर 10 अंकी पॅन क्रमांक आणि 12 अंकी आधार कार्ड क्रमांक टाकावा लागणार आहे. आधार कार्डवर असलेले नाव टाकावे लागेल. सर्व माहिती अचूक भरल्यानंतर त्याखाली दिलेला व्हेरिफिकेशन कोड टाकून ‘लिंक आधार’ या पर्यायावर क्लिक करावं लागेल. यानंतर लगेच आधार कार्ड पॅनशी लिंक होण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. तुम्हाला आधार कार्डशी संलग्नित मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. तो टाकून पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा