राज्यातील सर्व २८८ मतदारसंघात स्वा. सावरकर गौरव यात्रा निघणार-बावनकुळे

0

नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील विधानसभेच्या सर्व 288 मतदारसंघांत भाजप आणि शिवसेना यांच्या वतीने ‘सावरकर गौरव यात्रा’ (Savarkar Gaurav Yatra) काढण्यात येणार आहे. या यात्रेत सर्व नेते, पदाधिकारी, बूथ कमिटीचे सदस्य सहभागी होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. ‘देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे (Vinayak Damodar Savarkar) मोठे योगदान आहे. सावरकरांचे हे योगदान १३० कोटी भारतीय कधीच विसरु शकत नाहीत, असे बावनकुळे म्हणाले.
या यात्रांसाठी भाजपने प्रदेश व क्षेत्र संयोजकांची नियुक्ती केली आहे. पूर्व विदर्भाची जबाबदारी आमदार प्रवीण दटके व आमदार विजय रहांगडाले यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तर पश्चिम विदर्भाची जबाबदारी आमदार रणधीर सावरकर व आमदार संजय कुटे यांच्याकडे सोपविली गेली आहे. याप्रसंगी बोलताना बावनकुळे यांनी सांगितले की, क्रांतीवीर मदनलाल धिंगरा हे सावरकरांचे पहिले हुतात्मा शिष्य होते. अनेक क्रांतीवीरांनी सावरकरांसोबत येऊन स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. १८५७ चा उठावाचा इतिहासाचे लेखन करण्याचे श्रेय स्वातंत्र्यवीर सावरकरांनाही दिले जाते. लंडनमध्ये क्रांतीवीरांना मदत करताना सावरकरांना अटक करण्यात आली होती. त्यांना जन्मठेपेच्या दोन शिक्षा झाल्या होत्या. मात्र, त्यांच्यावर टिका करणारे राहुल गांधी हे कारागृहात एक दिवसच काय तर एक तासही राहु शकणार नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा