नागपूर होणार राममय

0

पोद्दारेश्वर मंदिरची ऐतिहासिक शोभायात्रा : 80 हुन अधिक चित्ररथांचा समावेश

नागपूर. श्रीराम नवमीच्या (Shri Ram Navami ) पर्वावर नागपुरातून (Nagpur) निघणाऱ्या शोभायात्रा सर्वदूर प्रसिद्ध आहे. 3 वर्षांच्या खोळंब्यानंतर यंदा पुन्हा मोठ्या जल्लोषात शोभायात्रा काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पोद्दारेश्वर राम मंदिरातून (Poddareshwar Ram Temple) निघणाऱ्या ऐतिहासिक शोभायात्रेचे यंदाचे 57 वे वर्ष असून यानिमित्ताने शहरात अयोध्याच अवतरल्याचा भास होणार आहे. यंदा 80 हून अधिक चित्ररथ सहभागी होणार असून श्रीराम, लक्ष्मण, सीता विराजमान असणारा मुख्य गज रथ आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. शोभायात्रा आयोजन समितीतर्फे आज पत्रकार परिषद घेऊन शोभायात्रेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. मंदिराचे यंदाचे शताब्दी वर्ष असल्याने भव्य प्रमाणावर विविध कार्यक्रम सुरू आहेत. भाविकांमध्येसुद्धा मोठा उत्साह दिसून येत आहे. राम नवमीच्या दिवशी पहाटे 4 वाजतापासून धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ होईल. दुपारी 12 च्या ठोक्याला रामजन्माचा सोहळा होईल. तत्पश्चात शोभायात्रेची तयारी सुरू होईल. दुपारी 4.30 वाजता पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गज रथाचे पूजन करून शोभायात्र सुरू होईल.

शंख वादक पथक वेधणार लक्ष

शोभायात्रेत मंगलवाद्य पथक, स्केटिंग पथक, शिवगर्जना पथक, लोकनृत्य पथक, मंगल कलशसह 500 जणांचे शंख वादन करणारे पथक सहभागी होईल. अनेक चित्ररथही लक्ष वेधून घेतील. त्यात छत्रपती शिवरायांना आई भवानीने दिलेली तलवार, हनुमानाचा शंखनाद, शिव-पार्वती विवाह, आई बालाजी दर्शन, महाबली हनुमानाची वानरसेन, भोले भंडारीची नंदी, रामसेतू निर्माण, रावण जटायू युद्ध, होळीच्या रंगात रंगणारे राधाकृष्ण, नृसिंह अवतार, पंढरीची वारी, हनुमानाची शिव आराधना, रामेश्वर ज्योतिर्लिंग स्थापना आदी प्रसंग चित्ररथांतून झळकतील.

21 हजार स्वयंसेवक सांभाळतील व्यवस्था

14 किमी मार्गावरून ही शोभायात्रा जाणार आहे. मोठ्या प्रमाणावर गर्दीची शक्यता असल्याने व्यवस्था सांभाळण्यासाठी 2 हजार संस्था मदतीसाठी पुढे आल्या आहेत. या संस्थांचे 21 हजार कार्यकर्ते संपूर्ण व्यवस्था सांभाळतील. सुरक्षेच्या दृष्टीने चोख पोलिस बंदोबस्त राहणार आहे. संवेदनशील ठिकणी अधिक पोलिस कुमक तयार राहील. संपूर्ण शोभायात्रा सुमारे 3 किलोमीटरहून अधिक लांबीची राहण्याची शक्यता आहे. एका ठिकाणी उभे राहून संपूर्ण शोभायात्रा पाहण्यासाठी दोन तास लागतील.

आग्याराम देवी चौकात आतषबाजी

शोभायात्रे दरम्यान होणारी आतषबाजी डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरते. त्यामुळे आतषबाजी होते त्याठिकाणी अलोट जनसागर लोटत असतो. पूर्वी व्हेरायटी चौकात आतषबाजी केली जायची. तिथे पूल झाल्यानंतर माटे चौकात आतषबाजी व्हायची. यंदा आग्याराम चौकात आतषबाजी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. शोभायात्रेत सुसज्जीत रुग्णवाहिका डॉक्टरांसह सहभागी राहणार आहे.

रामझुल्यावर पार्किंग

रामझुल्याचा एक भाग सध्या वाहतुकीसाठी बंद आहे. याठिकाणी दुचाकी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मेयो रुग्णालयाच्या सुरक्षा भिंतीलगत कडेला चारचाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे यंदा पार्किंगची समस्या जाणवणार नाही. शोभायात्रेच्या मार्गावर विविध संस्थांकडून प्रसाद, शरबत, शीतपेय वितरित केले जाणार आहे. त्यांना प्लॅस्टिक टाळण्यासह स्वच्छता राखण्याची सूचना करण्यात आली आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा