नवी दिल्ली: दिल्ली महानगर पालिकेत भाजपची १५ वर्षांची सत्ता संपुष्टात आणत आम आदमी पार्टीने बाजी मारली. मतमोजणी सुरुच असून आपने आतापर्यंत १२६ जागा जिंकत दिल्ली महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकवला (MCD Election Results). तर भाजपला आतापर्यंत ९७ जागांवर विजय मिळाला आहे. या दोन पक्षांच्या लढाईत काँग्रेसची चांगलीच फजिती झाली असून कांग्रेसला जागांचा दुहेरी आकडा देखील अद्याप गाठता आलेला नाही. काँग्रेसने आतापर्यंत केवळ ७ जागा जिंकल्या आहेत. 2017 मध्ये भाजपने तत्कालीन 270 पैकी 181 नगरपालिका वॉर्ड जिंकले होते, तर आम आदमी पार्टीला फक्त 48 जागांवर समाधान मानावे लागले होते. कॉंग्रेस 30 जागा जिंकून तिसऱ्या स्थानावर होती. मात्र, आता भाजपची सत्ता संपुष्टात आली असताना काँग्रेसला देखील या निवडणुकीत मोठा फटका बसला आहे.
मागील रविवारी ४ डिसेंबर रोजी दिल्ली महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान पार पडले होते. या निवडणुकीत ५०.४७ टक्के मतदान झाले. दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत २५० प्रभागांमध्ये एकूण १३४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.
यंदाच्या निवडणुकीत ‘आप’ला जवळपास ४३ टक्के मते पडली आहेत. संपूर्ण निकाल जाहीर होईपर्यंत या आकडेवारीत बदल होऊ शकतो. तर भाजपला आतापर्यंत ३९ टक्के मते मिळाली आहेत. काँग्रेस पक्षाच्या मतांच्या टक्केवारीत मात्र घट झालेली दिसत आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत ९ टक्क्यांची घट होऊन त्यांना आतापर्यंत १२.५ टक्के मते मिळाली आहेत.