जेलमध्ये राहिल्याने संजय राऊतांवर इतर कैद्यांचा प्रभाव -बावनकुळे यांचे प्रत्युत्तर

0

मुंबईः महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरील तणातणीवर बोलताना संजय राऊत यांनी शिंदे सरकार षंढ आणि नामर्द असल्याची टीका केली होती. त्यांच्या टीकेवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President Chandrashekhar Bawankule ) यांनी पलटवार केला. बावनकुळे म्हणाले, “संजय राऊतांना ही भाषा शोभत नाही. जेलमध्ये राहिल्याने इतर कैद्यांचा प्रभाव त्यांच्यावर पडला असावा. ठाकरे सरकारने अडीच वर्षात हा मुद्दा का सोडवला नाही. मंत्री बेळगावात गेले नाही म्हणून सरकार षंढ, नामर्द आहे म्हणणे, ही भाषा त्यांना शोभत नाही. मर्दांनगी आणि सरकार चालवण्याची धमक शिंदे-फडणवीसांमध्ये आहे, हे राऊतांना माहिती आहे. सामाजिक वातावरण अशांत करून होत नाही, असेही बावनकुळे म्हणाले.
बावनकुळे म्हणाले, मागील अडीच वर्षे आघाडीचे सरकार होते, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. मग सीमाप्रश्नाबाबत त्यांनी काय प्रयत्न केले? हा विषय सर्वोच्च न्यायालयात असताना सीमाभागात तणाव निर्माण करून हा प्रश्न सुटणार नाही. एसटी फोडणे, गाड्या फोडणे, ही काही लोकशाहीची लक्षणे नाहीत. त्यांनी गोटा मारला म्हणून आपण वीट मारायची हे योग्य नाही. मातोश्रीमसोर हनुमान चालिसा म्हणू पाहणाऱ्या रवी व नवनीत राणा यांना तुम्ही जेलमध्ये टाकले. त्यांना वाईट वागणूक दिली. हा खरा हा षंढपणा आहे, ही खरी नामर्दांगी आहे. फडणवीस आणि शिंदे हे संयमाने काम करीत आहेत. त्यामुळे राऊतांनी त्यांना आव्हान देऊ नये. राज्याचे राजकीय वातावरण खराब करू नये, असेही ते म्हणाले.