भूखंड घोटाळ्याच्या आरोपांवर अब्दुल सत्तार मंगळवारी उत्तर देणार

0

नागपूरः राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर भूखंड घोटाळ्याचे गंभीर आरोप झाले आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षांनी केली असल्याच्या पार्श्वभूमीवर सत्तार यांची काय भूमिका आहे, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. नागपुरात नसलेल्या सत्तार यांनी या आरोपांवर उद्या सभागृहातच उत्तर देणार असल्याचा संदेश प्रसार माध्यमांना पाठविला आहे. या संपूर्ण विषयाची माहिती आपण घेत असून उद्या सभागृहातच त्यावर उत्तर देणार आहोत, असे सत्तार यांनी नमूद केले (Abdul Sattar to reply on land Scam tomorrow) आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी जमिन घोटाळा केल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षांनी आज विधानसभेत केला होता. मात्र, सत्तार नागपुरात नसल्याने त्यांची बाजू पुढे आलेली नाही. काही काळ ते नॉट रिचेबल असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यांनी संदेश पाठवून उद्या उत्तर देणार असल्याची घोषणा केलीय.


विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करताना विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आरोप केला की, सत्तार यांनी महसुल राज्यमंत्री असताना गायरान जमिन नियमबाह्य पद्धतीने खासगी व्यक्तीला दिली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महसूल राज्यमंत्री असताना त्यांनी वाशीम जिल्ह्यातील १५० कोटींची ३७ एकर गायरान जमीन खासगी व्यक्तीला दिली. त्यांनी कायदेशीर बाबींचं उल्लंघन केले असून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने देखील त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे सत्तार यांनी सिल्लोड येथील कृषी प्रदर्शनीसाठी बेकायदेशीर निधी गोळा केल्याचा आरोपही पवार यांनी केला. दरम्यान, या प्रकरणावर मंत्र्यांकडून स्पष्टीकरण दिले जाईल तसेच काही बैकायदेशीर प्रकार घडला असल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर दिले. मात्र, त्याने विरोधकांचे समाधान झाले नाही. या गोंधळातच विधेयकांसह महत्वाचे कामकाज तसेच लक्ष वेधी सूचना मांडल्या गेल्या. विरोधकांनी सत्तार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गोंधळ कायम ठेवल्याने सभागृहाचे कामकाज वारंवार तहकूब झाले. मात्र, गोंधळ कायम राहिल्याने ते दोन वाजता दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सोमवारी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याबाबत अतिशय आक्रमक भूमिका घेतली. सत्तार यांचे नाव न घेता तत्कालीन महसूल राज्यमंत्री असा त्यांनी सत्तार यांचा उल्लेख केला. नागपूर खंडपीठाने कृषीमंत्र्यांविरोधात कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत, याकडे लक्ष वेधून पवार यांनी सांगितले की, “महसूल राज्यमंत्री असताना त्यांनी वाशीम जिल्ह्यातील १५० कोटींची ३७ एकर गायरान जमीन खासगी व्यक्तीला दिली. त्यांनी कायदेशीर बाबींचं उल्लंघन केलं आहे. अब्दुल सत्तार यांच्याविरोधात ठोस पुरावे आहेत. त्यांनी पदाचा दुरुपयोग केला आहे. राज्य सरकार, सुप्रीम कोर्टाचा निर्णय़ माहिती असतानाही एका व्यक्तीला फायदा मिळवून देण्यात आला. त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. त्यांनी राजीनामा न दिल्यास त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी.”