मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला. पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर करताना अजित पवारांची उपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. आता या मुद्यावर अजित पवारांनी मौन (NCP Leader Ajit Pawar on Sharad Pawar Decision) सोडले आहे. “राज्यातील, देशातील सर्व पक्षीय नेते आणि कार्यकर्ते यांचा आग्रह मान्य करून आदरणीय शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासह पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह वाढवणारा आहे”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी व्यक्त केली.
अजित पवार यांनी यासंदर्भात लांबलचक ट्विट केले आहे. ते म्हणतात, “महाविकास आघाडी, देशातील विरोधी पक्षांची एकी यांना बळ देणारा हा निर्णय आहे. शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहण्याच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर त्यांनी हा निर्णय घेतला असून त्यांचं वय आणि प्रकृतीची काळजी घेऊन आपण सर्वांनी येणाऱ्या काळात अधिक जबाबदारी उचलावी. एकजुटीने आणि अधिक जोमाने काम करावे. साहेबांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजूबत करावा, असे आवाहन मी करतो. साहेबांच्या निर्णयानंतर आम्ही सर्वजण पुन्हा नव्या जोमाने पक्षाच्या कामाला लागलो आहोत”, असेही अजित पवार यांनी नमूद केले आहे.
“साहेबांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावे, या आग्रहास्तव अध्यक्ष निवड समितीने त्यांच्या निवृत्तीचा निर्णय फेटाळून लावला.तेच अध्यक्षपदी कायम राहतील, हा निर्णय एकमताने झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एक कुटुंब असून साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्ष राज्यात,देशात उज्ज्वल यश संपादन करेल” , असेही पवारांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.
अजित पवार यांनी ट्विट केले असले तरी पवारांच्या पत्रकार परिषदेपासून ते दूर का राहिले, हे अद्यापही रहस्य बनलेले आहे.